रेल्वे अग्निकांड: अपघातापेक्षा घातपाताची शक्यता

नेल्लोरे: तामिळनाडू एक्स्प्रेसला लागलेली आग ही केवळ एक अपघात नसून तो घातपाताच्या सुनियोजित कटाचा भाग असू शकतो; अशी शक्यता या प्रकरणाचा तपास करणारया स्फोटक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली चेन्नई तामिळनाडू एक्प्रेसच्या एस ११ या डब्याला आग लागून त्यात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची चौकशी करण्यासाठी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी एक उच्चाधिकार समिती नियुक्त केली आहे.

या दुर्घटनेची चौकशी करताना दुर्घटनाग्रस्त डब्यात तज्ज्ञांना मिळालेल्या काही धाग्यांवरून हा अपघाताचा नव्हे तर घातपाताचा प्रकार असल्याची शंका घेण्यास वाव आहे; असे सूत्रांनी सांगितले. तपास यंत्रणांनी काही प्रवाशांचे जबाब घेतले. यापैकी काही जणांनी आग लागण्यापूर्वी डब्यात स्फोटाचा आवाज ऐकल्याचे सांगितले. याच डब्यात असलेल्या काही तरुणांचे वागणे संशयास्पद असल्याचेही एका प्रवाशाने नमूद केले आहे. आग लागल्यानंतर या डब्यात येणारा दुर्गंध हा शोर्टसर्किटमुळे येणारया वासापेक्षा भिन्न असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी फ्रेडरिक मिशेल यांनी सांगितले. आणखी एका प्रवाशाने आगीच्या ठिकाणाहून वेगवान लोळ पाहिल्याचे जबाबात सांगितले.

रेल्वेमंत्री रॉय यांनीही घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या आगीचा निरोप आला; त्यात रेल्वे अधिकाऱ्यानेही गाडीत स्फोट झाल्याचाच उलेख केला होता. रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या गेटमनने ही स्फोटाचा आवाज ऐकल्याचे सांगितले.

Leave a Comment