गोविंदासाठी यंदा भरभक्कम रकमेच्या बक्षिसांची लालूच

मुंबई दि.१ – जन्माष्टमीचा उत्सव आता केवळ दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील आणि मुंबईबाहेरच्या गोविंदा टीमने जोरदार सराव सुरू केला आहे. त्याचवेळी दहीहंडी मंडळाचे आयोजकही आपल्या कार्यक्रमाकडे गोविंदानी आकर्षित व्हावे म्हणून मोठ मोठ्या रकमांच्या बक्षिसांची लालूच दाखवू लागले आहेत. मुंबईतील प्रमुख मंडळांनी अद्याप बक्षिसाच्या रकमा जाहीर केलेल्या नसल्या तरी गतवर्षीपेक्षा यंदा त्या अधिक असतील असे सांगण्यात येत आहे. प्रत्येक मंडळ अगोदर दुसर्‍या मंडळाने रक्कम जाहीर करावी यासाठी प्रतीक्षा करत आहे.

संघर्ष मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी यंदा १७० गोविंदा पथकांना आमंत्रण दिले आहे मात्र बक्षिसाची रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा १० मजली मनोरे करणार्‍यांना २५ लाख, नऊ मजली मनोर्‍याला ११ लाख तर ८ मजली मनोर्‍याला १ लाख रूपये देण्यात येणार असल्याचे समजते. गतवर्षी या मंडळात आलेल्या स्पेनच्या पथकाने मोठी गर्दी खेचली होती. यंदाही या मंडळात स्पेन, मोरोक्को आणि चिले देशाची पथकेही सामील होणार आहेत.

संस्कृती युवा प्रतिष्ठान ठाणे या मंडळाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी १११ गोविंदा पथकांनी त्यांच्या दहीहंडीत सहभाग घेतला होता तेव्हाच बक्षिसापोटी ५५ लाख रूपयांची रक्कम दिल्याचे सांगितले. मंडळाचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी यंदा १० मजली मनोर्‍यासाठी २५ लाख तर नऊ व आठ मजली मनोर्‍यांसाठी ११लाख व ५०,००० अनुक्रमे देण्यात येतील असे सूचित केले आहे. मंडळाने यंदा स्टेजसाठी नितीन देसाई यांच्याऐवजी राजू सावला यांना कंत्राट दिले असून स्त्रीभ्रूण हत्या आणि सेव्ह द गर्ल चाईल्ड हे विषय प्रामुख्याने निवडले आहेत.

मनसेचे राम कदम यांच्या घाटकोपर येथील राम कदम मंडळाने गतवर्षी दिलेल्या ५५ लाख रूपयांच्या रकमेपेक्षा यंदाची रक्कम अधिक मोठी असेल असे सांगितले असून हे मंडळ शहरातील सर्वात मोठे मंडळ असल्याचाही दावा केला आहे. यंदा मंडळाचा सारा भर टोलनाक्यांवरील भ्रष्टाचार तसेच नागरिकांची टोलनाकयांवर होत असलेली लूटमार यावर असून यासंबंधी जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Leave a Comment