मायक्रोसोफ्टची नवी ‘आउटलूक डॉट कॉम’ ईमेल सेवा

सेन फ्रान्सिस्को: मायक्रोसोफ्ट ही संगणक प्रणालीतील आघाडीची कंपनी ‘आउटलूक डॉट कॉम’ या नव्या वेबसाईटद्वारे नेटिझन्सना ईमेल सेवा उपलब्ध करून देणार आहे. या सेवेचे प्रकाशनपूर्व प्रदर्शन मंगळवारी करण्यात आले. या ईमेल सेवेच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमुळे ती ग्राहकांच्या पसंतीस उतरेल; असा विश्वास मायक्रोसोफ्टचे उपाध्यक्ष ख्रिस जोन्स यांनी यावेळी व्यक्त केला.

या ईमेल सेवेचा वापर करणार्यांना याच साईटवरून फेसबुक किंवा ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही वापरता येणार आहेत. त्याचप्रमाणे सध्या वापरल्या जाणारया ईमेल वेबसाईट्सच्या तुलनेत आउटलूकच्या इनबॉक्समध्ये ३० टक्के अधिक ईमेल्स दिसणार आहेत.

या वेबसाईटचे प्रमुख वैशिष्ट्य सांगताना जोन्स म्हणाले की; या वेबसाईटवर आलेले मेल्स किंवा अटेचमेंटस कंपनीकडून उघडून पाहिले जाणार नाहीत. त्यामुळे ही साईट वापरणार्यांना नि:शंक राहून मेल्स पाठविता किंवा स्वीकारता येतील. त्याचप्रमाणे या साईटवर नोंदणी करताना देण्यात आलेली माहिती जाहिरात कंपन्यांना विकली जाणार नाही आणि या साईटवर मेल्स वाचताना त्यावर जाहिरात दिसणार नाही. त्यामुळे ही साईट वापरणे अधिक सुलभ आणि समाधानकारक असेल;असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मायक्रोसोफ्टने सन १९९७ मध्ये हॉटमेल ही ईमेल सुविधा उपलब्ध करून दिली होती. या साईटची जागा आता आउटलूक डॉट कॉम घेणार आहे.

Leave a Comment