पहिल्या युरी मिल्नर अॅवॉर्डचे अशोक सेन मानकरी

थेरॉटिकल फिजिक्स या विषयात यंदापासूनच देण्यात येणार्‍या युरी मिल्नर अॅवार्डसाठी यंदा नऊ जणांची निवड करण्यात आली असन त्यात भारताच्या अशोक सेन यांचा समावेश आहे. नोबेल पारितोषिकाच्या जवळजवळ तिप्पट रकमेचे हे अॅवॉर्ड असून यामुळे अशोक सेन यांना १६ कोटी ७० लाख रूपयांचे पारितोषिक मिळणार आहे.जगातील सर्वात आकर्षक अॅवॉर्ड मध्ये या अॅवॉर्डचा समावेश आहे.

 ५० वर्षीय युरी मिल्नर हा रशियन मूळचा फिजिक्सचा विद्यार्थी होता. मात्र पदवीपूर्वीच त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. १९८९ सालात त्याने फेसबुक, ट्वीटर स्पोर्टीफाय यासारख्या सोशल साईटमध्ये गुंतवणूक करून तो अब्जाधीश बनला. त्यासाठी त्याला अवघा तीन वर्षांचा अवधी लागला आणि त्यामुळे सिलीकॉन व्हॅलीत त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. सध्या विविध फंडातून त्याची गुंतवणूक १२ बिलीयन डॉलर्स इतकी आहे आणि खासगी मिळकत आहे १ बिलीयन डॉलर्स. मास्को स्टेट युनिव्हर्सिटी आणि आणि रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्स या संस्थातून फंडामेंटल फिजिक्सचे शिक्षण घेतलेल्या मिल्नरचे या विषयाचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही आणि त्यातूनच या विषयात विशेष कामगिरी करणार्‍या संशोधकांना जगमान्यता मिळावी या उद्देशाने त्याने हे अॅवॉर्ड देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी निवडण्यात आलेल्या सर्व नऊ जणांची निवड युरीनेच केली असली तरी हे नऊ जण आता पुढील वर्षात कोणाकोणाला हे अॅवॉर्ड द्यायचे याचा निर्णय घेणार आहेत.

यंदाचे विजेते अशोक सेन यांना २००१ साली पद्मपुरस्कार प्राप्त झाला असून १९९४ साली तरूण संशोधकांना देण्यात येणारे भटनागर पारितोषिकही त्यांनी मिळविले आहे. १९९८ मध्ये ते रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे फेलो बनले असून १९९५ मध्ये ते इंडियन नॅशनल सायन्स ऑफ अॅकॅडमीचेही फेलो झाले आहेत.