सिव्हिल इंजिनिअरींगचे नवे पैलू

अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आता बर्‍याच नवनव्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. त्यांची संख्या सुद्धा अफाट आहे. परंतु या शिक्षणाच्या खर्‍या दोन शाखा म्हणजे सिव्हील आणि मेकॅनिकल इंजिनिअरींग. अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम सुरू झाले त्या काळामध्ये या दोन शाखांचा अभ्यास केला जात असे. १९८० च्या दशकात तर सिव्हील इंजिनिअरींगला एवढे वाईट दिवस आले की, हजारो सिव्हील इंजिनिअर्स बेकार दिसायला लागले आणि या शाखेकडे कोणी प्रवेश सुद्धा घेईनासे झाले. आता मात्र पुन्हा एकदा या शाखेला झळाळी आली आहे आणि सिव्हील इंजिनिअर्सना प्रचंड मागणी यायला लागली आहे. या क्षेत्राला जसजसे नवनवे रूप येत आहे आणि चांगले दिवस येत आहेत, तसतसे त्याचे स्वरूप सुद्धा बदलत चालले आहे.

देशामध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये निघत आहेत आणि त्या महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीच्या माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर सायन्स अशा सध्या चलती असलेल्या विषयांबरोबरच सिव्हील इंजिनिअरींगचा अभ्यास अवश्य सुरू केलेला आहे. असे असले तरी सिव्हील इंजिनिअरींगच्या स्वरुपामध्ये आता फारच बदल झालेला आहे. त्याला आता लँड सर्व्हे, प्लॅनिंग आणि डिझायनिंग या नव्या विषयांची जोड मिळालेली आहे. डिझायनिंगच्या विषयात धरणांचे डिझाईन, इमारतींचे डिझाईन आणि पुलांचे डिझाईन अशा विविध डिझायनिंगच्या कामांचे स्पेशलायझेन विकसित व्हायला लागले आहे. या विषयामध्ये एक नवीन विषय थोडा अनपेक्षितपणे समाविष्ट झाला आहे, तो विषय प्राधान्याने सिव्हील इंजिनिअरींगचा असला तरी प्रत्यक्षात त्याचा संबंध मात्र पुरातत्व खात्याशी आहे. सध्या सार्‍या जगातच आपल्या पुरातन वास्तूंचे जतन करण्याबाबत जागरुकता निर्माण झालेली आहे.

मात्र जुन्या इमारती, राजवाडे, किल्ले आणि मंदिरे यांचे जतन करणे म्हणावे तेवढे सोपे राहिलेले नाही. त्यातल्या काही इमारती तर मोडकळीस आलेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा त्या जतन कराव्यात असा आग्रह होत आहे. त्यातूनच सिव्हील इंजिनिअरींगची एक नवी शाखा विकसित झाली आहे. त्यामध्ये पुरातन इमारतींचे पुनर्वसन, पुनरुज्जीवन आणि जतन अशा विषयांचा आंतर्भाव आहे. त्याचबरोबर फार पुरातन नसलेल्या पण गेल्या दीड-दोनशे वर्षात निर्माण झालेल्या पुलांचे आणि शासकीय इमारतींचे सुद्धा जतन करणे आवश्यक झालेले आहे. भारतामध्ये इंग्रजांच्या काळात निर्माण झालेली अनेक धरणे आता जुनी झाली आहेत. त्यांचे आयुष्य संपलेले आहे. अशी धरणे निकामी करण्यापेक्षा त्यांचे कमीत कमी खर्चामध्ये पुनरुज्जीवन केले तर सरकारचा पैसाही वाचणार आहे. म्हणून जुन्या धरणांचे पुनरुज्जीवन हा एक वेगळाच विषय सिव्हील इंजिनिअरींगमध्ये पुढे आलेला आहे. सिव्हील इंजिनिअरींग ही रुटीन शाखा वाटण्याची शक्यता आहे, पण तिला अनेक आकर्षक आयाम आहेत.

Leave a Comment