विराटचे विराट शतक भारताची ३-१ ने मालीकेत आघाडी

कोलंबो,दि.१ – विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने मंगळवारी चौथ्या वनडेत श्रीलंकेवर सहा विकेटसनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली.

विराटने दमदार फॉर्म कायम ठेवत १३वे शतक साजरे केले. गेल्या आठ डावांमधील कोहलीच हे सहावे शतक ठरले. विजयासाठी २५२ धावांची गरज असताना भारताची २३ षटकांत ४ बाद १०९ अशी अवस्था होती. गौतम गंभीर (०), वीरेंदर सेहवाग (३४), रोहित शर्मा (४) आणि मनोज तिवारी (२१) हे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. मात्र कोहलीने सुरेश रैनाच्यासाथीने पाचव्या विकेटसाठी नाबाद १४६ धावांची दमदार भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी , श्रीलंकेने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पार्टटाइम लेगस्पिनर मनोज तिवारीने चार विकेटस घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला आळा घातला. त्यामुळे श्रीलंकेला ८ बाद २५१ धावांचीच मजल मारता आली.

सलामीवीर उपुल तरंगाच्या अर्धशकाचा (५१ धावा) अपवाद वगळता यजमानांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तब्बल आठ गोलंदाज वापरले. त्यातच सेहवाग आणि तिवारी या पार्टटाइम फिरकीपटूंनी चमक दाखवली. तिवारीच्या चार विकेटस ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. लेगस्पिनर राहुल शर्माच्याजागी त्याला स्थान देण्यात आले. तिवारीने गोलंदाजीत चमक दाखवत निवड सिद्ध केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यावर यजमानांकडून उपुल तरंगा (५१) आणि तिलकरत्ने दिलशान (४२) या सलामीवीरांनी १८ षटकांत ९१ धावांची चांगली सलामी दिली. मात्र अशोक डिंडाने दिलशानचा अडसर दूर केला. त्यापाठोपाठ तरंगाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बाद केले. लहिरू थिरिमने (४७) आणि दिनेश चंडिमल (२८) यांनी तिस-या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. मात्र अश्विनने चंडिमलला बाद केले. त्यानंतर योग्य भागीदारी करण्यात श्रीलंकेच्या फलंदाजांना अपयश आले.

मात्र, लसिथ मलिंगा आणि रंगना हेरथ या शेवटच्या फलंदाजांनी ९ व्या विकेटसाठी अवघ्या १८ चेंडूत बाद ३२ धावा केल्या. त्यांच्या भागीदारीमुळे यजमानांना अडीचशेचा पल्ला ओलांडता आला. मनोज तिवारीने टाकलेल्या डावाच्या शेवटच्या षटकात तर या जोडीने १८ धावा कुटल्या.

भारतातर्फे मनोज तिवारीने चार, आर. अश्विनने दोन तर अभिनव दिंडा आणि विरेंद्र सेहेवाग यांनी प्रत्येतकी एक-एक गडी बाद केले.

मालिकेतील पाचवी आणि शेवटची वनडे शनिवारी (४ ऑगस्ट) खेळण्यात येणार आहे.