मुंबईचे वैभव असलेल्या गोथिक इमारतींच्या जतनासाठी शासनाचा प्रकल्प

मुंबई: मुंबई शहरातील ऐतिहसिक वास्तू त्यांच्या मूळ स्वरूपात शास्त्रीय पद्धतीने जतन करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले असून पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या दुरुस्ती, देखभालीचे काम दोन वर्षात पूर्णत्वाला जाईल; अशी ग्वाही मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ऐतिहसिक वास्तू जतन करण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, प्रभारी जिल्हाधिकारी हिरालाल सोनावणे, कार्यकारी अभियंता किशोर पाटील, वास्तुविशारद आभा लांबा उपस्थित होते.

या कामाच्या पहिल्या टप्प्यात एशियाटिक लायब्ररी, ओल्ड कस्टम हाउस, जुने सचिवालय, शासकीय विज्ञान संस्था आणि एल्फिन्स्टन कॉलेज या वास्तूंचे मूळ स्वरूपात जतन करण्यासाठी दुरुस्ती आणि देखभाल केली जाणार आहे.

एशियाटिक लायब्ररीच्या १७९ वर्ष जुन्या इमारतीचे छत उतरविण्याचे काम सुरू असून त्याच प्रकारचे नवीन छत बसविण्यात येणार आहे. मुंबई शहराचे ऐतिहासिक वैभव प्रकट करणारया या इमारती पुढील दीडशे वर्ष आहे त्या स्वरूपात टिकतील; असे नियोजन करण्यात आले आहे; असे पाटील यांनी सांगितले. या कामासाठी लांबा आणि विकास दिलावरी या वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment