निष्काळजीपणाचे बळी

दिल्लीवरून चेन्नईला जाणार्‍या तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये सोमवारी भल्या पहाटे आग लागली आणि त्या आगीमध्ये एक डबा पूर्ण जळून खाक झाला. त्यात ४५ जणांचे मृत्यू झाले. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचे अपघात होतच आहेत आणि त्यात अनेकांचे बळी जात आहेत. परंतु गेल्या पाच-सहा वर्षातील अपघातांकडे बारकाईने पाहिले तर रेल्वेमध्ये आग लागून अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले दिसेल. रेल्वेच्या एका विशिष्ट डब्यालाच आग लागते हे केवळ निष्काळजीपणामुळेच होत असते. त्यामागची काही कारणे असतात आणि ती सारी कारणे रेल्वेच्या कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे घडत असतात. काही वेळा एखाद्या डब्यामध्ये कोणी तरी स्टोव्ह पेटवतो. त्यामुळे आग लागू शकते. अनेकदा रॉकेल, पेट्रोल असे ज्वालाग्रही पदार्थ बेकायदारित्या रेल्वेतून नेले जातात आणि त्यातून आगीच्या घटना घडून डब्याला आग लागते. असे ज्वालाग्रही पदार्थ वाहून नेले जात असताना कोणी तरी सिगारेट पेटवतो आणि हा अपघात होतो. सिगारेट पिना मना है अशा सूचना रेल्वेत मोठ्या अक्षरात लावलेल्या असतात आणि तरीही सिगारेट पेटवली जाते.

सिगारेट पेटवणारा तर त्या सूचनेची पर्वा करतच नाही पण आपल्यासमोर एक व्यक्ती सिगारेट पेटवत आहे हे दिसत असतानाही कोणी प्रवासी त्याला हटकत नाहीत. कारण उगाच भांडण मोल घेण्याची लोकांना हौस नसते. मात्र अशा प्रसंगात रेल्वेतल्या पोलिसांना किंवा टी.सी.ला या गोष्टीची माहिती देण्याचीही दक्षता कोणी घेत नाही. परिणामी अशा आगीच्या घटना घडतात. या घटना प्रवाशांच्या बेपर्वाईने घडतात. मात्र शॉर्टसर्किटमुळे ज्या आगी लागतात, त्या आगी मात्र रेल्वेच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाने लागलेल्या असतात. रेल्वेमध्ये सध्या काटकसर केली जाते. आतील दिवे, पंखे आणि स्वच्छता गृहातील दिवे यांच्यासाठी केलेले वायरचे कनेक्शन लूज झाले असेल तर ते बदलण्याच्या ऐवजी आहे त्यालाच डागडुजी करून वापरले जाते. अशा अनावश्यक काटकसरीमुळे शॉर्टसर्किटच्या घटना घडत असतात. आहे तीच सामुग्री वापरणे आणि देखभाल न करणे यामुळे अनेकांचे जीव जातात. तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये काल लागलेली आग अशाच शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे. ज्या पद्धतीने आग लागली आणि ती पसरली तीवरून तरी हा प्रकार शॉर्टसर्किटचाच असावा, असा संशय येत आहे.

रेल्वेचे डबे तयार करताना अनेक ज्वालाग्रही वस्तू वापरलेल्या असतात त्यामुळे कोणत्याही कारणाने छोटीशी ठिणगी पडून आग लागली की ती आग काही क्षणातच डबाभर पसरते. एकंदरीत अशा घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपल्या देशात गेल्या ४० वर्षात होऊन गेलेल्या रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेला आपली लोकप्रियता वाढवण्याचे साधन करून टाकले. जो कोणी मंत्री झाला त्याने आपल्या राज्यात काय काय करता येईल याचा विचार केला. लालूप्रसाद यादव यांनी रेल्वे फायद्यात चालते हे दाखवून देण्यावर भर दिला. ममता बॅनर्जी यांनी रेल्वे स्वस्त करण्यावर भर दिला पण यातल्या एकाही मंत्र्याने रेल्वेचा प्रवास सुरक्षित करण्यावर भर दिला नाही. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे करोडो भारतीय प्रवासी मनात चिंता घेऊनच प्रवास करीत असतात.जगातली ही सर्वात मोठी रेल्वे सुरक्षित कधी होणार असे कायम विचारले जात असते आणि त्याचे निर्णायक उत्तर कोणीच देत नाही. रेल्वेचे अपघात आणि त्यात अनेकांचे बळी जाणे जारी आहे. आपला रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होईल, असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे. कारण भारतात रेल्वे प्रवास करणार्‍या प्रवाशांना आपण इच्छित स्थळी वेळेवर आणि सुरक्षित पोचू याची खात्री राहिलेली नाही.

भारतीय रेल्वे ही जगातली सर्वात मोठी रेल्वे आहे आणि तिच्याने दररोज करोडो प्रवासी प्रवास करीत असतात. जगातली ही सर्वात मोठी रेल्वे मोठी असण्याबरोबरच तेवढीच सुरक्षितही असावी याला या रेल्वेच्या व्यवस्थापनाने कधीच सर्वोच्च प्राधान्य दिलेले नाही. सध्या जगामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बरीच प्रगती होत आहे आणि तिच्यामुळे रेल्वेचे अपघात टाळण्याचेही तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहे. अशा तंत्रज्ञानावर आधारलेल्या काही यंत्रणा आणि साधने भारतीय रेल्वेला उपलब्ध सुद्धा झालेली आहेत. पूर्वीच्या काळी सुरक्षेचा मुद्दा समोर आला की, पैशाचे रडगाणे गायिले जायचे. पण आता पैशाचाही प्रश्‍न नाही आणि तंत्रज्ञानाचाही प्रश्‍न नाही. परंतु रेल्वेचे अपघात कमी करणार्‍या या यंत्रणा तातडीने बसवणे, त्यांच्या चाचण्या घेणे आणि चाचण्यांमध्ये आढळलेले दोष काढून या यंत्रणा निर्दोष करणे ही कामे म्हणाव्या तेवढ्या तत्परतेने केली जात नाहीत. रेल्वेच्या प्रवाशांचा जीव आपल्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा आहे असे या व्यवस्थापनात बसलेल्या अधिकार्‍यांना आणि तंत्रज्ञांना मनापासून वाटत नाही. त्यामुळे ही दिरंगाई होत आहे. प्रवाशांचे जीव जातच आहेत.

Leave a Comment