नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मदत देणार- अजितसिंग

मुंबई दि.३१- दीर्घकाळ रेंगाळलेल्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जलद पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केंद्राकडून केली जाईल याची खात्री विमानवाहतूक मंत्री अजित सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या भेटीत दिली असल्याचे समजते.

यावेळी बोलताना सिंग यांनी चव्हाण यांना असेही आश्वासन दिले आहे की राज्याने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची आणि केंद्राच्या कॅबिनेट कमिटीची १५ ऑगस्टपूर्वी बैठक घेण्यात येईल आणि त्यात विमानतळाच्या कामासाठीच कायदेशीर बाबींची संपूर्ण चर्चा केली जाईल. विमानतळ उभारणीचे प्रत्यक्ष काम मार्च २०१३ मध्ये सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळाच्या उभारणीसाठी केंद्राने २००७ सालीच मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने उभारणीपूर्वीची अनेक कामे पूर्ण केली असून त्यात पर्यावरण परवानगी, ट्रान्समिशन लाईन्स, कनेक्टीव्हिटी, जमीन संपादन, विस्थापितांचे पुनर्वसन अशा कामांचा समावेश आहे. दोन्ही कमिट्यांमध्ये होणार्‍या बैठकीत वाहतूक व्यवस्था, आर्थिक निर्बंध यावर चर्चा होणार असून या प्रकल्पाचे मॉनिटरींग थेट पंतप्रधान कार्यालयाकडूनच केले जात असल्याचे समजते. खासगी सार्वजनिक सहयोगातून हा विमानतळ उभारला जाणार असून हाही प्रकल्प कांही काळ वादात सापडला होता. महाराष्ट्र शासनालाही यासाठी लागणार्‍या जमिनीपैकी ४८५ हेक्टर जमीनीचे संपादन करताना अजूनही अडचणी येत आहेत कारण येथील जमीनमालकांनी हेक्टरी २० कोटी रूपयांची नुकसान भरपाई मागितली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पर्यावरणासंदर्भातही कांही संस्थांनी या प्रकल्पाला आक्षेप घेतले आहेत.

Leave a Comment