दारासिंह यांच्या स्मृती जागणार रुपेरी पडद्यावर

मेरठ: लोखंडाचे मनगट आणि लोण्यासारखे मन असलेले आदरणीय मल्ल, चित्रपट अभिनेता आणि राज्यसभेचे खासदार म्हणून परिचित असलेले दारासिंह यांच्या स्मृती चित्रपटाच्या माध्यमातून चंदेरी पडद्यावर जागविण्यात येणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा बिंदू यांनी दिली.

या चित्रपटाची संहिता तयार आहे. दारासिंह यांच्या भूमिकेसाठी नायकाचा शोध सुरू आहे; असे सांगून बिंदू म्हणाले की; प्रमुख भूमिकेसाठी सनी देओल किंवा अक्षय कुमार यांच्या नावाचा विचार सुरू आहे. रविवारी दारासिंह यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी बिंदू मेरठ येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

दारासिंह यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कर्तृत्व यावर लिखाण तयार झाले आहे. या संदर्भात अक्षय कुमार व सनी देओल यांच्याशी संपर्क साधला असता ते दोघेही या भूमिकेत स्वत:ला सिद्ध करण्याबाबत साशंक आहेत. अक्षय कुमारने म्हटले आहे की दारासिंह सारखे दुसरे कोणीच असू शकत नाही. तरीही अक्षय कुमार दारासिंह यांची भूमिका वठवू शकेल अशी आशा आहे; असे बिंदू यांनी सांगितले.

मेरठ, जम्मू, दिल्ली, मुंबई व चंदिगढ ही शहरे दारासिंह यांना सर्वात जास्त आवडत होती. दारासिंह हे माणुसकीचे एक उत्तम उदाहरण होते. ते नेहमी म्हणत की; मी गेल्यावर कोणीही रडू नका. सर्व जण हसत खेळत आनंदी राहा.

गंगा प्रदूषित होऊ नये म्हणून आपल्या अस्थींचे विसर्जन गंगेत करू नये असे ही त्यांनी नमूद केल्याचे बिंदू यांनी सांगितले.

Leave a Comment