टोल भैरवाचे कारनामे मनसे टांगणार फेसबुकच्या वेशीवर

मुंबई: राज्यातील ‘टोल भैरवां’ना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या आंदोलनाला अधिकाधिक लोकांचा डोळस पाठिंबा मिळावा म्हणून टोलच्या लुटमारीची आकडेवारी घरोघर पोहोचविण्यासाठी मनसैनिकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पत्रक आणि पुस्तिका यासारख्या पारंपारिक साधनांबरोबरच फेसबुक आणि मनसेच्या अधिकृत वेबसाईटचाही वापर केला जाणार आहे.

राज्यातील प्रवाशांची टोल भैरावांकडून होणारी लूट आणि त्या ठेकेदारांना मिळणारा शासकीय, प्रशासकीय पाठींबा याचे बिंग फोडण्यासाठी अनेक मनसैनिकांनी अनेक दिवस अनेक टोलनाक्यांवर उभे राहून प्रत्यक्ष माहिती गोळा केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ या सारख्या शासकीय विभागातूनही माहिती घेतली. रस्त्याच्या बांधकामाचा, देखभालीचा खर्च वसूल होऊनही वर्षानुवर्ष टोल वसुली सुरूच असल्याचे या माहितीच्या विश्लेषणातून समोर आले. ही सर्व माहिती, आकडेवारी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मनसेने पत्रके प्रसिद्ध केली असून मनसैनिक त्याचे घरोघर वितरण करणार आहेत.

आधुनिक तंत्राचा प्रभावी वापर करण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहेमीच जागरूक असतात. हा संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपारिक माध्यमाबरोबरच माहितीच्या जाळ्याचा; अर्थात वेब साईट्सचा वापर मनसेने केला आहे. मनसेच्या अधिकृत वेब साईटवर टोल भैरवाचे कारनामे मनसेने प्रसिद्ध केले आहेतच. याशिवाय फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटवरही तो उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment