अपघातांचे भयावह प्रमाण

आपल्या देशाची लोकसंख्या भरपूर आहे. त्यामुळे आपल्याला माणसाची किंमत कळत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनावर उठणारे विविध प्रकारचे अपघात आपल्या देशात विपुल संख्येने होत असतात. शक्यतो सुरक्षेचे नियम पाळावेत आणि माणसे हकनाक मरू नयेत, याबाबत आपण कसली दक्षताच घेत नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या वाहनांच्या अपघातापासून ते आगीपर्यंत विविध प्रकारचे अपघात सातत्याने होत असतात आणि भारतात हजारो लोक अशा अपघातांमध्ये मरत असतात. भारतातील अपघाती मृत्यूचे प्रमाण दरवर्षी १ लाख लोकसंख्येला ३२  एवढे आहे. म्हणजे दरवर्षी एक लाखामागे ३२ लोक कसल्या ना कसल्या अपघाताने मरतात. याबाबतीत पश्‍चिम बंगालमधील असनसोल हे शहर भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे एक लाखामागे १०७ लोक दरवर्षी अपघातांना बळी पडतात. याबाबतीत असनसोलनंतर कानपूरचा क्रमांक असून कानपूरमध्ये हे मृत्यूचे प्रमाण ७० एवढे आहे. पुण्याने याबाबतीत आघाडी घेतली असून पुण्यामध्ये अपघाती मृत्यूचे प्रमाण ५३.५ आहे.

पुणे आणि मुंबई ही शहरे रस्ता वाहतुकीच्या बाबतीत आणि इतरही सुरक्षांच्या बाबतीत चांगली असल्याचे सांगितले जाते. परंतु या दोन्ही शहरांनी २०११ साली विविध प्रकारच्या अपघातांमध्ये हजारो लोकांचे बळी घेतलेले आहेत. अपघातांमध्ये सुद्धा काही अपघात आपल्या हातातले नसतात. ते नैसर्गिक असतात. उदा. वीज पडून मरणे. या अपघाताला आपण काहीच करू शकत नाही. जुन्या इमारती पडणे, उंचावरून पडणे, मद्यप्राशन असे प्रकारही काही प्रमाणात आपल्या हातात आणि काही प्रमाणात निसर्गावर अवलंबून असतात. मात्र विमान अपघात, रस्त्यावरील अपघात, स्फोट, शॉर्टसर्किट, कारखान्यातील अपघात, आग लागणे, गर्भपात, विषबाधा, चेंगराचेंगरी ही कारणे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतात. थोडीशी शिस्त पाळली, वाहतुकीचे नियम पाळले, गाडी चालवताना मद्यप्राशन केले नाही, विजेचे कनेक्शन्स योग्य आहेत की नाही हे वारंवार पाहिले तर हे मानव निर्मित अपघात टळू शकतात. अपघाती मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे शक्य नाही. परंतु शक्यतो असे अपघात टाळण्यासाठी काही तरी केले पाहिजे आणि सुरक्षेचे नियम पाळले पाहिजेत. पण तसे होत नाही आणि आपण आपल्याच हाताने बरेच अपघात ओढवून घेतो.

आपल्या हाताने ओढवून घेतलेल्या अपघातांमध्ये रस्त्यावरील वाहनांचे अपघात, स्टोव्हचा भडका, उंचावरून पडणे या अपघातांचा प्रामुख्याने समावेश होतो. भारतात दर साल १ लाख ४२ हजार लोक रस्त्यावरील वाहनांच्या अपघातात मरण पावतात. या संबंधातल्या आकडेवारी वरून असे निष्पन्न होते की, भारतात दर मिनिटाला एक रस्ता अपघात होत असतो. रस्त्यावरील वाहतुकीचे नियम नीट पाळले जात नसल्यामुळे असे अपघात होत आहेत आणि वरचेवर वाढत चालले आहेत. अपघातांमध्ये स्टोव्हचा भडका उडून महिलांचे मृत्यू हे एक मोठे कारण दिसून आलेले आहे. एकट्या पुणे शहरात २०११ साली ५११ जण वाहनांच्या रस्त्यावर होणार्‍या अपघातामुळे जीव गमावून बसले आहेत. वाहनांच्या वाहतुकी विषयीचे नियम न पाळणे, सरकारने बाद ठरवलेल्या गाड्या वापरणे, वाहनांचा वेग अमर्याद करणे अशा गोष्टींमुळे हे अपघात होतात. एकट्या
महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात स्टोव्हचा भडका उडून जळून मरण पावणार्‍या महिलांची संख्या ८ हजाराच्या जवळपास आहे. चार वर्षात ८ हजार महिला म्हणजे दरवर्षाला साधारण दोन हजार महिला स्टोव्हच्या भडक्याने मरतात. दरवर्षी दोन हजार याचा अर्थ दररोज सरासरी पाच ते सहा महिला अशा अपघातात जीव गमावतात. म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर महाराष्ट्रात दर चार तासाला एक महिला स्टोव्हच्या भडक्यात आपला जीव गमावते.

महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीवर या आकडेवारीने मोठाच भेदक प्रकाश पडलेला आहे. स्टोव्ह ही वस्तू वापरायला फार अवघड आहे आणि तिचे तंत्रज्ञान फार गुंतागुंतीचे आहे असे तर काही म्हणता येत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की, स्टोव्हच्या भडक्याचे आणि त्यात विवाहितांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या चार वर्षापासून सतत वाढलेले आहे. २००८ साली ही संख्या १८०० होती. ती २००९ साली शंभराने वाढली आणि नंतरच्या दोन वर्षात ती अशीच वाढत गेली. स्टोव्हचा भडका उडून महिला जळाली आणि मरण पावली अशी फिर्याद पोलिसात दाखल होते आणि या घटनेची नोंद अपघात अशी होते. तशी नोंद झाल्यानंतर तो स्टोव्हचा भडका खरोखर झाला होता का, याचा कोणी शोध घेत नाही. अनेकवेळा स्टोव्हचा भडका हा बहाणा असतो, तो प्रत्यक्षात झालेला नसतो आणि सदर महिलांना सरळ अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलेले असते आणि स्टोव्हचा भडका उडाला अशी नोंद करून अपघाताचा देखावा केलेला असतो. पोलिसांचे लागेबांधे किंवा तपास करण्याच्या बाबतीतील उदासीनता या गोष्टीमुळे पोलिसही अशा अपघाताच्या खोलात शिरत नाहीत.