वास्तू विशारद

१९९५ पूर्वी आपल्या देशात स्थापत्य अभियंत्यांना फार मागणी नव्हती. आता मात्र मुक्त अर्थव्यवस्थेचा एक परिणाम म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू झाली आहेत आणि स्थापत्य अभियंत्यांना (सिव्हिल इंजिनियर्स) मागणी आली आहे. कोणतीही इमारत बांधताना मुळात इंजिनियर कशाला लागतो असा प्रश्‍न लोक विचारतात. मग त्यांना आर्किटेक्ट (वास्तू शिल्पज्ञ) कशाला हवा असाही प्रश्‍न पडणारच. आता आता इंजिनियरचा सल्ला न घेता बांधकाम न केल्यास बरेच नुकसान होते ही गोष्ट लोकांना कळायला लागली आहे पण अजून ग्रामीण भागात तरी बांधकामाच्या आधी आर्किटेक्टचा सल्ला घेतला पाहिजे असे समजले जात नाही. शहरांत मात्र आर्किटेक्टना फार मागणी आहे कारण आर्किटेक्टमुळे घर कमी किंमतीत अधिक सोयिस्कर तसेच देखणे कसे होईल, याचा विचार केला जात असतो.

आपण घर किंवा इमारत बांधतो ती सोयीसाठीच बांधत असतो. पण चार बाजूंनी चार भिंती बांधल्या म्हणजे इमारत होत नसते. त्या चार भिंतीच्या आता निर्माण होणारे अवकाश घराच्या मालकाच्या सोयीनुसार तयार झाले पाहिजे. ते कसे  निर्माण करता येईल, याचा विचार करून ती निर्माण होणारी इमारत कशी होईल, याचे नेमके चित्र आर्किटेक्ट आपल्या डोळ्यासमोर उभे करीत असतो. या अवकाशावर आपले राहणे सुसह्य होणार की नाही हे ठरत असते. लाखो रुपये खर्चून घर बांधायचे, पण घरात आल्याबरोबर एकदम उदासच वाटते. दुपारी छान झोपच लागत नाही अशा अनेक तक्रारी नंतर निर्माण होतात. कारण आर्किटेक्टचा सल्ला घेतलेला नसतो. हा सल्ला मौल्यवान असतो याची जाणीव लोकांना होत असल्यामुळे वरचेवर आर्किटेक्टना मागणी यायला लागली आहे.

आर्किटेक्टचा अभ्यासक्रम बारावीनंतर पाच वर्षांचा आहे. बारावीला गणित, फिजिक्स आणि रसायन शास्त्र हे विषय घेऊन किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र आर्किटेक्चर प्रवेश परीक्षा द्यावीं लागेल. दहावी नंतर अभियांत्रिकीचा कोणताही पदविका अभ्यासक्रम पुरा करणार्‍या विद्यार्थ्यालाही आर्किटेक्चरचा हा अभ्यासक्रम करता येतो. या प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्याला सौंदर्यशास्त्राची आणि चित्रकलेची किती जाण आहे याची परीक्षा घेतली जाते. ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरातल्या अनुदानित किंवा खाजगी आर्किटेक्ट महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. राज्यात अनेक ठिकाणी आर्किटेक्ट महाविद्यालये निघालेली आहेत. या प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज आणि माहिती पुस्तिका
.dte.org.in या संकेत स्थळावर तिची अधिसूचना जारी झाल्यावर मिळू शकते.