नवी दिल्ली दि.३१- राहुल गांधी केंद्रीय मंत्रीमंडळात येण्याची अथवा महत्त्वाचे पद भूषविण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे एका वरीष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. मंत्रीमंडळात येण्याऐवजी राहुल पक्ष कार्यातच अधिक सक्रीय होण्याची जास्त शक्यता असल्याचेही हे नेते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंत्रीमंडळातील फेरबदल कसे करायचे याला अंतिम स्वरूप दिले असून ८ ऑगस्टला पार्लमेंट पुन्हा सुरू होण्याअगोदरच यासंबंधीची घोषणा केली जाणार आहे.
राष्ट्रपतीपदावर गेलेल्या प्रणवदांचे अर्थखाते अपेक्षेप्रमाणे गृहमंत्री चिदंबरम यांच्याकडेच जाणार असल्याचे सांगण्यात आले असून पंतप्रधान मनमोहनसिंग अर्थखात्याची जबाबदारी सांभाळण्यास फारसे उत्सुक नाहीत. कारण त्यांना तब्येतीच्या कांही तक्रारी आहेत. मात्र त्याचवेळी आपला थोडका राहिलेला कार्यकाळ व्यवस्थितपणे पार पडावा आणि या काळात नवीनच कांही अडचणी येऊ नयेत अशीही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे अर्थखात्याचा भार चिदंबरम यांच्याकडे जाणार असून त्यांच्या जागी उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अर्थात काही कारणांनी शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळाले नाही तर त्यांना लोकसभेचे अध्यक्षपद नक्कीच दिले जाईल असेही सांगण्यात येत आहे. शिंदे यांना कुठलेही पद मिळाले तरी त्यांच्यासाठी ही अनपेक्षित बढती आहे.
सुशीलकुमार शिदे यांचे महाराष्ट्रातले राजकीय करियर कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तुलनेत खूपच उशीरा सुरू झाले आहे. तसेच शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणावर जेवढी पकड आहे तेवढी सुशीलकुमारांची कधीच नव्हती. शिंदे यांना अर्थखाते अथवा लोकसभापती पद मिळाले तर शरद पवार यांची ती एक प्रकारे क्रूर थट्टाच होणार असून पवारांच्या नुकत्याच पार पडलेल्या नाराजी नाट्यामागे हेही एक कारण होते असेही सांगितले जात आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या उर्जाखात्याचा भार काँग्रेसच्या युवा नेत्यावर सोपविला जाणार असून त्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू आहे. या खात्यासाठीचे नांव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही असे सांगितले जात असले तरी काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी लक्षात घेता ऐनवेळी या खात्याची माळ कॉर्पोरेट अफेअर मंत्री विरप्पा मोईली यांच्या गळ्यात पडेल असेही संकेत दिले जात आहेत.