पत्रकारितेचे अभ्यासक्रम

journalism

सध्या आपल्या जीवनामध्ये पत्रकारितेचे महत्व वाढत चाललेले आहे आणि माध्यमांचे आपल्या जीवनातले स्थानही उंचावत आहे. या स्थानामुळे पत्रकारिता हे एक चांगले करिअर म्हणून बुद्धीमान तरुणांना आकृष्ट करत आहे. बर्‍याच विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठातील पत्रकारितेचे पूर्णवेळचे अभ्यासक्रम करणे परवडते. परंतु काही विद्यार्थ्यांना हौस असून सुद्धा पूर्णवेळच्या अभ्यास क्रमांना प्रवेश घेणे आणि पूर्णवेळ देऊन अभ्यासक्रम करणे जमत नाही. असे विद्यार्थी पत्रकारितेचे अल्पवेळचे अभ्यासक्रम शोधत असतात. त्यांचा हा शोध विचारात घेऊन भारतामध्ये शेकडो संस्थांनी पत्रद्वारा किंवा अर्धवेळचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत.

मात्र, या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना धड थिअरीचाही अभ्यास नीट करता येत नाही आणि प्रॅक्टिकल तर करायलाच मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणाची हौस भागते पण प्रॅक्टिकलच्या अभावी ते सक्षम पत्रकार होऊ शकत नाहीत. किंबहुना असे अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी पत्रकार म्हणून नोकरी सुद्धा मिळवू शकत नाहीत. अभ्यासाचा वेळ आणि फी मात्र वाया गेलेली असते. प्रॅक्टिकल करत करत पूर्ण केलेले पत्रकारितेचे अभ्यासक्रम मात्र विद्यार्थ्यांना चांगले पत्रकार होण्यास खरोखर उपयुक्त ठरत असते. अशा प्रकारचे अभ्यासक्रम जर वृत्तपत्राच्या कार्यालयातच करता आले तर ते जास्त उपयुक्त ठरत असतात. त्या दृष्टीने सध्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

`इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्र समुहाने स्वत:चा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमात पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि दैनिकात काम करत करतच पत्रकारिता शिकवली जाते. सन २०१२-१३ या वर्षाच्या अभ्यासक्रमाची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, त्यासाठी १५ मे पर्यंत अर्ज करावयाचे आहे. हा अर्ज इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर पाठवावा लागेल. ही वेबसाईट www.exims.in अशी आहे. अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना ३ जून रोजी लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि तोंडी मुलाखतही द्यावी लागेल. अभ्यासक्रम ६ ऑगस्ट २०१२ रोजी सुरू होईल. वयाची अट आहे. ३० वर्षाच्या आतील उमेदवारच अर्ज करू शकतात. या वृत्तपत्राने पत्रकार तयार करण्यासाठी म्हणून एक्सप्रेस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया स्टडीज अशी स्वतंत्र संस्था उभी केली आहे.

`दैनिक भास्कर’ या वृत्तपत्राचाही असाच उपक्रम सुरू झाला आहे. भास्कर स्कूल ऑफ मीडिया स्टडीज अशी संस्था निर्माण केली असून या संस्थेचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या संस्थेच्या प्रशिक्षणाची आखणी अमेरिकेतील डेल कार्नेगी ट्रेनिंग कन्सल्टन्सस् या संस्थेच्या मदतीने करण्यात आलेली आहे. या अभ्यासक्रमात वृत्तपत्राच्या केवळ संपादकीयच नव्हे तर सर्व अंगांचे शिक्षण दिले जाणार आहे.