केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळातील खांदेपालटावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मान्यतेची मोहोर उमटविली असून बुधवारपासून उर्जामंत्री सुधीलाकुमार शिंदे गृहमंत्रीपदाची धुरा सांभाळतील तर गृहमंत्री पी. चिदंबरम अर्थ खाते सांभाळतील.

मंत्रिमंडळातील खातेबदलाला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यावर मंगळवारी संध्याकाळी याबाबत अधिसूचना जरी करण्यात आली. गेल्या दोन दिवसात निम्म्या देशात विजेचा खेळ खंडोबा झालेला असताना सुशीलकुमार शिंदे यांच्या खांद्यावरून उर्जा विभागाचे ओझे उतरले आहे. हा भार कंपनी कामकाज मंत्री वीरप्पा मोईली यांच्या वाट्याला आला आहे. शिंदे यांच्यावर लोकसभा नेतेपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यावर प्रणबदांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते रिंगणात उतरले आणि अर्थ विभागाची जबाबदारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या अखत्यारीत घेतली. मात्र आता अर्थमंत्रीपद चिदंबरम यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. चिदंबरम यांनी यापूर्वीही ही जबाबदारी पार पडली आहे.