सरकारने मुद्दाम वीज घालवली: संजय सिंग यांची मल्लीनाथी

नवी दिल्ली: लोकांना टीम अण्णाच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी सरकारनेच मुद्दाम उत्तर भारतातील वीज गायब केली असल्याची मल्लीनाथी टीम अण्णामधील वाचाळ सदस्य संजय सिंग यांनी केली आहे.

भ्रष्टाचार आणि सरकारच्या निष्क्रियतेबद्दल चीड असलेले लोक टीम अण्णाच्या उपोषण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येने जंतरमंतर येथे येत आहेत. मेट्रो ट्रेन बंद पडून लोकांना आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचता येऊ नये; यासाठी सरकारनेच रविवारी रात्री वीज पुरवठा यंत्रणेत बिघाड घडवून आणला आहे; असा आरोप सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

सरकार वीज रोखू शकेल; मेट्रो, बस, ट्रेन, रिक्षा बंद पडू शकेल; मात्र लोकांना टीम अण्णाच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखू शकणार नाही; अशी राणा भीमदेवी थाटातील गर्जनाही त्यांनी केली आहे.