नवी दिल्ली: लोकपाल विधेयकाबाबत सरकार गंभीर नाही असा आरोप करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राज्यसभेत संयुक्त पुरोगामी आघाडीचे बहुमत नसल्याचे लक्षात घेत नाहीत; अशी खंत केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली. वास्तविक या विधेयकावर सहमती घडवून आणण्यासाठी सरकारने काय पाऊले उचलली याची सविस्तर माहिती आपण त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कथन केल्याचेही ते म्हणाले.
केवळ आंदोलने करून लोकपाल विधेयक संमत होणार नाही; असे सांगून खुर्शीद एका इफ्तार पार्टीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की; लोकपाल विधेयक संमत व्हावे हीच सरकारची भावना आहे. सरकार त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. या विधेयकावर सर्व सहमती व्हावी अशी सरकारची इच्छा आहे; असेही खुर्शीद यांनी सांगितले.
अण्णा आणि खुर्शीद यांच्या गुप्त भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की; लोकपाल विधेयकाबाबत सहमती घडवून आणण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती आपण अण्णांना या बैठकीत दिली. सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन अण्णांनी या विधेयकासाठी आंदोलन करू नये; असे आवाहनही त्यांना केल्याचे खुर्शीद यांनी सांगितले. ही बैठक गुप्त राहावी ही अण्णांची मागणी होती; सरकारची नाही; असा खुलासाही त्यांनी केला.