मोदींची भलामण करणे दर्डा यांना भोवणार

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणे, त्यासाठी त्यांना वाघाची उपमा देणेआणि राष्ट्रीय संत म्हणून त्यांचा उल्लेख करणे काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांना चांगलेच महागात पडणार आहे. दर्डाच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षातूनच शेलकी टीका व्हायला सुरुवात झाली आहे. दर्डा मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत.

अहमदाबाद येथे जैन समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांचा मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला दर्डा विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी मोदींची भलामण केली. ‘जो माणूस एवढा पुरुषार्थ दाखवितो त्याला वाघच म्हटले पाहिजे;’ असे उद्गार दर्डा यांनी काढले.

दर्डा यांनी मोदींचे कौतुक केल्याचे पडसाद लगेचच उमटण्यास सुरुवात झाली. मोदींबद्दल केलेल्या विधानाचा दर्डा यांना जाब द्यावा लागेल; असे काँग्रेस नेत्या जगदंबिका पाल यांनी सुनावले. त्याप्रमाणे त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी आणखी बोचरी टीका केली. दर्डा यांचे विधान दुर्दैवी असल्याची टीका करतानाच; ‘त्यांना कदाचित माणसे खाणारा वाघ म्हणायचे असेल;’ अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

दर्डांनी आपले कौतुक केल्याचे परिणाम काही तासातच भोगावे लागतील; असा इशारा मोदी यांनी त्याच कार्यक्रमात दिला होता. दर्डा मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत.

Leave a Comment