तामिळनाडू एक्स्प्रेस आगीच्या चौकशीचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली: तामिळनाडू एक्स्प्रेसला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी दिले आहेत. या आगीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदतही रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

नेल्लोरेजवळ दिल्ली चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेसच्या एका डब्यात शोर्टसर्किट होऊन गाडीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४७ प्रवासी ठार झाले तर २८ जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची मदतही रेल्वेमार्फत देण्यात येणार आहे.

दुर्घटनाग्रस्तांना तातडीची मदत आणि उपचाराचे साहित्य पोहोचविण्याबरोबरच प्रवाशांच्या नतेवाईकाना त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी विशेष ट्रेन चेन्नईहून रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी दिली.

रेल्वे सुरक्षा दलाच्या दक्षिण मध्य विभागाचे आयुक्त डी. के. सिंग या दुर्घटनेची चौकशी करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करतील.

रेल्वेमध्ये सातत्याने अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी नियमित तपासणी, देखभाल-दुरुस्तीबरोबरच विशेष सुरक्षा मोहीम हाती घेण्याचे आदेश रेल्वेच्या सर्व विभागाच्या सरव्यवस्थापकांना देण्यात आल्याचेही सक्सेना यांनी सांगितले.

Leave a Comment