राजेश खन्नांच्या संपत्तीतून डिंपल बेदखल

मुंबई: बॉलीवूड मधील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर आशीर्वाद बंगल्याच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादावर पडदा पडला असला तरी ‘काकां’च्या मृत्युपत्रावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांची मैत्रीण अनिता अडवानी यांनी आशीर्वाद बंगल्यावर आपला हक्क असल्याचा दावा केल्याने खळबळ माजली होती. कालांतराने खन्ना यांचे जावई अभिनेते अक्षयकुमारच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र राजेश खन्ना यांच्या मृत्युपत्राचे वाचन नुकतेच करण्यात आले. त्यात काकांनी आपल्या पहिल्या पत्नी अभिनेत्री डिंपल यांना आपल्या संपत्तीमधील एक छदामही न देता त्यांना बेदखल केले आहे. त्यांनी आपली सगळी संपत्ती रिंकी आणि ट्विंकल या दोघी मुलींना दिली आहे.

वास्तविक आयुष्याच्या संध्याकाळी; विशेषत: आजारपणाच्या काळात डिंपल या सतत राजेश खन्ना यांच्या सान्निध्यात होत्या. या काळात त्यांच्या जवळ असण्याचा काकांनाही आधार वाटत असावा; असे त्यांच्या प्रतिसादावरून जाणवत होते. मात्र त्यांच्या आपल्या पहिल्या पत्नीला बेदखल करण्याच्या निर्णयामुळे नवीन वाद उफ़ाळण्याची चिन्ह आहेत.

Leave a Comment