मानसशास्त्रात आकर्षक करिअर

psycatris

करिअर म्हणताच अभियांत्रिकी, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अशा काही ठराविक शाखाच डोळ्यांसमोर येतात. विशेषत: कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काही करिअर नावाचा प्रकार असतो, याचा सर्वांना विसर पडला आहे. करिअरची चर्चा करताना कला शाखेचे नाव सुद्धा कोणी काढत नाहीत इतकी ही शाखा दुर्लक्षित राहिली आहे. परंतु कला शाखेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा करता येईल असे आणि अतिशय आकर्षक करिअर आहे आणि ते मानसशास्त्रामध्ये आहे. भारत सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका आकडेवारीनुसार देशामध्ये कमीत कमी १.८० लाख मानसशास्त्रज्ञांची गरज आहे आणि देशात एक लाखावर सुद्धा मानसशास्त्रज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे कायम या व्यावसायिकांची टंचाई जाणवत असते.

सध्याचे जीवन फार धकाधकीचे झालेले आहे आणि लोक अनेक प्रकारचे तणाव घेऊन जगत आहेत. मानसिक तणाव हे शेवटी शारीरिक व्याधींना जन्म देत असतात आणि डॉक्टर मंडळी या शारीरिक आजारावर औषधे देत राहतात. मात्र अशा रुग्णांना समुपदेशन करून तणावातून मुक्त केले तर त्यांचे आजार पळून जाऊ शकतात. परंतु त्यासाठी त्यांना मानसशास्त्रज्ञाकडे जावे लागते. मानसशास्त्रज्ञांची मात्र चणचण आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मानसिक व्याधी बळावत आहे, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, त्यांच्या समुपदेशनाची सुद्धा गरज आहे. आता आता मुंबई-पुण्याच्या काही शाळांमधून विद्यार्थ्यांचे कायम समुपदेशन करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती व्हायला लागली आहे. येणार्‍या काळामध्ये विविध ठिकाणी मानसशास्त्रज्ञांच्या जागा रिकाम्या पडलेल्या दिसायला लागतील. सध्या संगणक शिक्षकांच्या जागा जशा रिकाम्या पडलेल्या दिसतात तशीच अवस्था मानस-शास्त्रज्ञांची व्हायला लागली आहे. अजून तरी ही गोष्ट म्हणाव्या तेवढ्या तीव्रतेने विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या लक्षात आलेली नाही.

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बी.ए.ला मानसशास्त्र हा विषय घेतला जातो. देशातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये बी.ए.च्या अभ्यासक्रमाला मानसशास्त्र हा विषय लावलेला आहे. परंतु केवळ मानसशास्त्र विषय घेतला म्हणून समुपदेशक होता येत नाही. त्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रवेश करण्याची कला अवगत असावी लागते. मानसशास्त्र विषय घेऊन पदवी घेणारे विद्यार्थी लाखोंनी असतील. परंतु त्या प्रमाणात समुपदेशक मिळत नाहीत, यामागे कदाचित हेच कारण असावे. मानसशास्त्र विषय घेऊन बी.ए. झाल्यानंतर एम.ए.ला क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात स्पेशलायझेशन केल्यास मानसशास्त्रज्ञ म्हणून व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा होतो. त्या व्यतिरिक्त बालमानस शास्त्रज्ञ हीसुद्धा प्रचंड मागणी असणारी एक मोठी शाखा सध्या विकसित होत आहे. त्याचे अल्प मुदतीचेही अभ्यासक्रम विविध विद्यापीठात उपलब्ध आहेत.