आपल्या देशात अभियांत्रिकीचे शिक्षण फार पसरत चालले आहे. आता तर महाराष्ट्रात सहाशेपेक्षाही अधिक इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आहेत. म्हणजे एकेकाळी कला, वाणिज्य महाविद्यालये जशी भरमसाठ निघाली तशी आता अभियांत्रिकी महाविद्यालये निघायला लागली आहेत. १९८० पूर्वी महाराष्ट्रात अवघी आठ अभियांत्रिकी महाविद्यालये होती. आताची ही महाविद्यालये इतकी झटपट निघाली आहेत की, त्या वेगाने या महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक निर्माण झाले नाहीत. त्यामुळे भारताचे निर्माण करणार्या या अभियंत्यांना शिकवायला चांगले तर सोडाच; पण सामान्य दर्जाचेही प्राध्यापक मिळाले नाहीत. परिणामी या महाविद्यालयांतून चांगले विद्यार्थी निर्माण झाले नाहीत. ते कोणत्या प्रकारचे आहेत याची एक परीक्षा घेण्यात आली. एका प्लेसमेंट सर्व्हिस चालवणार्या संस्थेने देशातल्या ५५ हजार अभियांत्रिकी पदवीधरांची परीक्षा घेतली. तेव्हा असे आढळून आले की त्यातल्या ४० टक्के इंजिनियर्सना इंग्रजी येत नाही.
या ४० टक्के लोकांना इंग्रजी वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि बोलताही येत नाही. या असमर्थतेमुळे त्यांची नोकरी मिळवण्याची पात्रता कमी होत आहे. खरे तर त्यांचे पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असते आणि शिक्षणाच्या, नोकरी मिळवण्याच्या प्रत्येक पायरीवर त्यांना, इंग्रजी चांगले आल्याशिवाय नोकरी मिळणार नाही आणि करीयरमध्ये प्रगतीही करता येणार नाही याची जाणीव दिलेली असते. या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शालेय शिक्षणात चांगले मार्क मिळालेले असतात आणि त्यांना बारावीच्या वर्गापर्यंत इंग्रजी हा अनिवार्य विषय असतो. एवढे असूनही यातल्या ४० टक्के विद्यार्थ्यांना कामापुरतेही इंग्रजी बोलता येत नसेल आणि त्यांना एकही व्याकरणशुद्ध वाक्य लिहिता येत नसेल, तर मग ते बारावीपर्यंत पास कसे झाले आणि त्यांना चांगले गुण कशाचे मिळाले, असे प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाहीत. ही सारी स्थिती शिक्षण, परीक्षा पद्धती आणि कथित गुणवत्ता यांच्या संबंधाने आपण एकदा मुळातून विचार केला पाहिजे असे आपल्याला बजावत आहे.
आपण असे मानून चालू की आपल्या शिक्षण व्यवस्थेने त्यांना चांगले इंग्रजी शिकवले नाही. पण तो त्या अपुर्या इंग्रजीच्या साहाय्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात येऊन पोचला आहे ना आणि तिथे करीयरसाठी इंग्रजी येणे गरजेचे आहे हे त्यांना कळले आहे ना? मग आता या अवस्थेत तरी आपण इंग्रजी बोलायला शिकले पाहिजे असे त्यांना का वाटत नाही? आता आता अनेक महाविद्यालयांच्या परिसरात स्पोकन इंग्लिशचे वर्ग सुरू असतात. त्यातल्या एखाद्या क्लासमध्ये प्रवेश घेऊन आपण आपल्यातली एक कमतरता भरून काढावी असे त्यांना का वाटत नाही? इंग्रजी ही अशी काय भारी गोष्ट आहे की ती आपल्याला अगम्य वाटावी? खरे तर आपण आता जी भाषा मराठी म्हणून बोलत असतो तिच्यात निम्मे शब्द इंग्रजीच असतात पण, या विद्यार्थ्यांत आपण परिपूर्ण असले पाहिजे याची आस नाही. आपल्याला चांगले करीयर करायचे असेल तर थोडे कष्ट घ्यावे लागतील याचे भान नाही आणि भान असले तरीही त्यासाठी प्रत्यक्षात परिश्रम करण्याची तयारी नाही. अशी सारी आपल्या स्वत:विषयीची आस्था आहे. त्यामुळे पदरात पदवीचे प्रमाणपत्र पडले आहे नोकरी करण्याइतपत सामान्य ज्ञान नाही अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातही फार चांगली स्थिती नाही. तिथेही या भाषेविषयी अनास्थाच आहे. ज्यांना इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेण्याची संधी मिळाली ते अशुद्ध का होईना पण आत्मविश्वासाने बोलतात; पण ज्यांना मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घ्यावे लागले त्यांचे फारच हाल आहेत. डॉक्टरांना एक तर नोकरी करावी लागतेच असे नाही. ते आपला स्वत:चा व्यवसाय करू शकतात. पण नोकरी करावीच लागली तर त्यांची परीक्षा फार कसोशीने घेतली जात नाही. पण काही वेळा याही विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अज्ञान उघडे पडते. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वैद्यकीय महाविद्यालयात एक मागासवर्गीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. कारण त्याचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते आणि त्याला वैद्यकीय महाविद्यालयातले इंग्रजी काहीच कळत नव्हते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. असे अनेक विद्यार्थी असतात पण ते आत्महत्या करीत नाहीत पण कसेबसे शिक्षण घेऊन नंतर अर्धवट ज्ञानाच्या आधारे व्यवसाय करून अनेक रुग्णांच्या मात्र हत्या करतात.
अनेक वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रश्न आहे. त्याची जाणीव वैद्यकीय महाविद्यालयांचे अभ्यासक्रम ठरवणारांना होती आणि त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात इंग्रजी शिकवण्याची सोय केली जावी, अशी सूचना केलेली आहे. पण असे वर्ग प्रत्यक्षात भरवले जात नाहीत. मेडिकल कौन्सिलही त्याची चौकशी करीत नाही. त्यामुळे असा वर्ग भरवणे हा अभ्यासक्रमाचाच भाग आहे याचा सर्वांना विसर पडला आहे. काही अपवादात्मक महाविद्यालयांत असे वर्ग आहेत पण तिथे विद्यार्थी इंग्रजी शिकायला तयार नाहीत कारण त्यांना त्याची काही आवश्यकता आहे असे वाटत नाही. शिकण्याची संधी असताना त्याची बेपर्वाईने उपेक्षा करायची आणि परीक्षेची वेळ आली की पश्चात्ताप करायचा अशी लोकांना खोड असते. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण त्याला तहान लागली असेल तर पाणी त्याने स्वत:च पिले पाहिजे. त्याला पाणी पाजण्याचे काम काही दुसर्यांना करता येणार नाही. आपल्या शिक्षणाने ही स्वावलंबीवृत्ती विद्यार्थ्यांत निर्माण केलेली नाही.