राज ठाकरे – मुख्यमंत्री भेट न होताच चर्चेला उधाण

मुंबई दि.२८ – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी होणारी बैठक रद्द होऊनही ही बैठक का होणार होती हाच राजकीय औत्सुक्याचा विषय ठरला असल्याचे दिसून येत आहे. ही बैठक होणार यावरून सुरू झालेली चर्चा बैठक रद्द झाल्यावर यातून काय राजकीय संदेश दिला आहे यावर आता घसरली असून राजकीय वर्तुळातून या भेटीसंबंधीच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राज्यात होत असलेल्या टोलवसुली प्रक्रियेत पारदर्शकता हवी आणि नव्या मराठी शाळांना परवानगी देण्यात राज्य शासनाकडून का दिरंगाई होत आहे या दोन मुद्यांसाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्याने व ते तापाने आजारी असल्याने ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. पारदर्शकता येईपर्यंत राज्यातील नागरिकांनी टोल भरू नये असे राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी आवाहन केले होते आणि टोल नाक्यांवर मनसे सैनिकांनी खडा पहाराच दिला होता. त्यानंतरच ही बैठक ठरविण्यात आली होती.

मात्र टोल हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील असून हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या सुरू  असलेली धुसफूस व हेवेदावे पाहता राज ठाकरे व मुख्यमंत्री भेटीबाबत अनेक तर्क लढविले गेले. अर्थात ही बैठक सध्या रद्द झाली आहे आणि नवीन बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही असा खुलासा मनसेतर्फे करण्यात आला असला तरी केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस राष्ट्रवादीची दिलजमाई सध्या तरी झाली असल्यानेही ही बैठक होऊ शकलेली नाही असेही सांगण्यात येत आहे.

२०१४ सालात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक होणार होती का किंवा ही बैठक भविष्यातील राजकारणाचे संकेत देत आहे का अशी आता नवीनच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे असेही समजते.

Leave a Comment