नवी दिल्ली: देशातील प्रस्थापित काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचार निपटून स्वच्छ आणि कार्यक्षम सरकार बनविण्यास अक्षम असल्याचा आरोप करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. सन 2014 च्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडणूक लढवतील असे त्यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
आपण देशभर दौरा करून खरोखर जनसेवेच्या भावनेतून निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांची चाचपणी करू आणि योग्य उमेदवाराचा प्रचार करू; असे अण्णांनी यावेळी सांगितले. अशा उमेदवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची की त्यांच्या संघटनातून राजकीय पक्षाची उभारणी करायची हा निर्णय सर्वस्वी उमेदवारांवर अवलंबून असेल; असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्ष स्थापन करण्यास आपली हरकत नाही. जनतेच्या हितासाठी पारदर्शकपणे काम चालेल तोपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र त्यातही स्वार्थी प्रवृत्ती शिरल्या तर आपण त्यातून अंग काढून घेऊ अशी स्पष्टोक्ती अण्णांनी केली.
लोकपाल विधेयक संमत करण्याबाबत राजकीय पक्षांची उदासीनता पाहूनच आपण आपले उमेदवार उभे करण्याच्या निर्णयाप्रत आलो आहोत; असे सांगून अण्णा म्हणाले की काँग्रेस किंवा भाजप; कोणीही सत्तेवर आले तरी भविष्य काळवंडलेले असणार हे निश्चित.
जर लोकपाल विधेयक संमत झाले तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे युपीए सरकार हे विधेयक येऊ देणार नाही हे निश्चित आहे; असे सांगून अण्णा म्हणाले की लोकापालाला कोणाकोणाचा विरोध आहे हे जनता जाणते. सध्या लोक फार काही करू शकत नसले तरीही सन 2014 च्या निवडणुकीत मतदार त्यांना आपली जागा दाखवतील; असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला.