आघाडीत नाराजी नाही – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, दि.२७ – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये औपचारिक समन्वय समिती नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अनेक आमदारांनी लेखी पत्राद्वारे नाराजी व्यक्ती केली, याबद्दल विचारणा केली असता, ‘प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना काही आमदारांनी पत्र लिहिले. त्यात विकासाचे मुद्दे आहेत. मंत्रिमंडळात समावेश करावा, अशीही मागणी काही आमदारांनी केली आहे. मात्र, कोणीही नाराजी व्यक्त केली नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी दोन ते तीन वेळा संपर्क झाला होता. राज्यातील समन्वय समितीबाबतच आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली. यापूर्वीही राज्यात समन्वय समिती होती. मात्र, यावेळेस औपचारीक समन्वय समिती तयार करण्यावर एकमत झाले. चांगला समन्वयासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरी, त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभी केली आहे. मी कोणत्याही ठिकाणी गेलो असा, सिंचनाचे प्रकल्प कधी पूर्ण होणार आहेत, हेच प्रश्‍न विचारले जात होते. त्यामुळे राज्यभर चर्चा करून सिंचनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ठोस माहिती हाती पडणे गरजेचे होते. त्यामुळेच सिंचनाच्या श्वेतपत्रिकेचा उल्लेख केला. परंतु, सिंचनमंत्री आणि कृषीमंत्री या दोघांनीही सादरीकरण केले आहे. तसेच, सभागृहातही प्रत्येक प्रश्‍नावर उत्तर दिले आहे. त्यामुळे सरकारकडून अधिकृत माहिती देणे म्हणजेच श्वेतपत्रिका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टोलनाक्यांची मोडतोड खपवून घेणार नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टोलनाक्यांवर केल्या जाणार्‍या हल्ल्यांचीही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. ‘कोणत्याही गोष्टीला विरोध असेल, तर कायदेशीर मार्गाने निषेध करावा. मात्र कोणी कायदा हातात घेत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment