तिरंगा फडकणार

उद्यापासून २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांना लंडन येथे सुरू होत आहे. जगातल्या समस्त देशांतला दुरावा कमी करून त्यांच्यात मैत्र आणि बंधुत्वाची भावना वाढवणारा हा उत्सव १२ आगष्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत भारताचे ८१ खेळाडू सहभागी होणार असून, ते तिकडे रवानाही झाले आहेत. भारत सरकारने बर्‍याच  उमेदीने आणि चांगली कामगिरी बजावण्याच्या आत्मविश्‍वासाने हा एवढा मोठा चमू पाठवला आहे. खेळाडूंची तयारी आणि सहभाग यावर सरकारने २५० कोटी रुपये खर्च करायचे ठरवले आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण देणारे शिक्षक निष्णात असावेत आणि त्यांनी खेळाडूंची चांगली तयारी करून घ्यावी म्हणून परदेशातले नामवंत प्रशिक्षक नेमले असून त्यावरही २० कोटी रुपये खर्चले आहेत. भारताचा ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा हा सर्वात मोठा चमू आहेच पण सरकारनेही या चमूवर खर्च करण्याचे ठरवलेली रक्कमही आजवरची विक्रमी रक्कम आहे. सरकारचा हा उत्साह अनाठायी नाही. भारताचे ऑलिंपिकमधील स्थान वाढत आहे म्हणून सरकारलाही हुरूप आला आहे. आजवर याबाबतची भारताची स्थिती दयनीय होती. १०० कोटी लोकांचा देश असूनही भारताचा संघ ऑलिंपिकमध्ये केवळ सहभागी होऊन हात हलवत परत येत असे. त्याला काही सन्माननीय अपवाद होते.

देश पारतंत्र्यात असताना १९२८ साली भारताने ऑलिपिकमधील पहिले सुवर्णपदक मिळवले होते. हे भारताचे पहिले पदक होय. ते वैयक्तिक नव्हते हॉकीतले होते. नंतर १९३२, १९४८, १९५६,१९६४ आणि १९८० असे पाच वेळा याच खेळात सुवर्णपदक मिळवून हॉकीतले आपले वर्चस्व दाखवून दिले. पण १९८० साली या सुवर्णयुगाचा अंत झाला. १९५२ साली खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवून स्वतंत्र भारताचा मान वाढवला होता. पण, नंतर भारताला १९९६ सालपर्यंत एकदाही वैयक्तिक पदक मिळवता आले नाही. मिल्कासिंगचे पदक थोणक्यात हुकले, पी.टी. उषाची संधी थोडक्यात गेली पण एकंदरीत भारताला हुलकावणीच बसली. १९९६ साली लिएंडर पेसने टेनिसमध्ये कांस्यपदक प्राप्त करून वैयक्तिक पदकांची मालिका सुरू केली. २००४ साली करनाम मल्लेश्‍वरी आणि राजवर्धन राठोड यांनी रौप्य पदके मिळवली आणि भारताचे नाव आता पदक तालिकेत बुडाला का होईना पण येणार याची शाश्‍वती वाटायला लागली. २००८ साल या दृष्टीने आतापर्यंतचे सर्वात चांगले वर्ष गेले कारण भारताच्या पदरात एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके पडली. अभिनव बिंद्राने भारताला नेमबाजीत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या यशामुळे आता होत असलेल्या लंडन ऑलिंपिकमध्ये निदान अर्धा डझन तरी पदके तरी पदरात पडतील अशी आशा वाटायला लागली आहे. अभिनव बिंद्रा पुन्हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरेल, असा विश्‍वास आहेच. पण भारताला तीन प्रकारांत बर्‍याच आशा आहेत. मुष्टीयुद्ध, नेमबाजी आणि टेनिस. तशा अनेक बाबतीत आशा व्यक्त केल्या जाऊ शकतात पण या तीन क्षेत्रातल्या आशा अपेक्षांना काही आधार आहे. कोणत्याही खेळात अशा अपेक्षा व्यक्त करण्याआधी जागतिक स्तरावरच्या काही सामन्यांत आपल्या देशातल्या खेळाडूंची काही तरी चमक दिसली पाहिजे. टेनिसच्या बाबतीत तसे दिसले आहे. सायना नेहवालने या क्षेत्रातल्या चीनच्या दादागिरीला चांगलाच शह दिला आहे. शिवाय भारताचे भूपती, पेस, सानिया मिर्झा यांनी अनेक स्पर्धात चमक दाखवली आहे. नेमबाजीतही भारताचे खेशाडू जागतिक स्पर्धांत अव्वल क्रमांकावर राहिले आहेत. मुष्टीयुद्धात भारताने गेल्या ऑलिंपिकमध्ये एक कांस्यपदक मिळवले आहेच पण गेल्या दोन तीन ऑलिंपिकमध्ये या प्रकारात भारताच्या मुष्टीयोध्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

मात्र, अन्यही काही प्रकारात आपण काही अपेक्षा करू शकतो अशी चांगली स्थिती आहे. आता आपण असे काही आशावादी बोलू तरी शकतो पण या संदर्भात आपली चीनशी तुलना होते तेव्हा फार वाईट वाटते. पाच वर्षांखाली चीनचाही काही पदक तालिकेत वरचा क्रमांक नव्हता पण चीनने स्थिती बदलवून दाखवली. तसे आपल्याला का करता येत नाही अशी खंत मनाला वाटते. आपला देश १२० कोटी लोकसंख्येचा आहे याचा विसर पडत नाही. आपल्या पेक्षा लोकसंख्येने नगण्य असलेले अनेक देश शेकड्यांनी पदके मिळवत असतात. इटली, जपान, स्पेन, बल्गेरिया, नॉर्वे, द. कोरिया हे देश भारताच्या लोकसंख्येच्या १० टक्के सुद्धा नाहीत पण पदकांच्या बाबतीत भारताच्या कितीतरी पटीने अधिक आहेत. आपण यापासून काही शिकणार आहोत की नाही? आपल्या देशातले सर्वात मोठे दुर्दैव असे की आपण खेळाडू हा माणसाचा वेगळा प्रकार करीत असतो. अमुक एक जण खेळाडू आहे असे आपण मानतो. पण प्रत्येकजणच खेळाडू का नसतो? प्रत्येकाने खेळाडू का असू नये? तशी संस्कृती आपण निर्माण केलेली नाही. ज्याचा अभ्यास चांगला नसतो तो खेळाडू असतो. हे चित्र बदलले पाहिजे.     

Leave a Comment