आदर्श प्रकरणी चुलत सासऱ्यांचा जबाब चव्हाणांना भोवणार

मुंबई: ‘आदर्श’ घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्रीपद गमावलेले अशोक चव्हाण आपल्या चुलत सासऱ्यांच्या जबाबाने आणखी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या नावावर खोटी भाडेपावती जोडून आदर्शच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यात आल्याचे त्यांनी चौकशी आयोगासमोर कबूल केले आहे.

चव्हाण यांचे चुलत सासरे मदनलाल शर्मा यांचा उच्च न्यायायालायाचे निवृत्त न्यायधीश जे. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने जबाब नोंदविला. आपली सन १९८५ पासून अंधेरीत सदनिका आहे. मात्र आदर्शच्या सदस्यत्वासाठी सोसायटीला केलेल्या अर्जात मुंबईत माझी स्वत:ची जागा नसल्याचा उल्लेख केला होता. त्यासाठी दि. ३० जून २००९ या तारखेची पावती जोडली. मात्र ही पावती खोटी आहे; असे शर्मा यांनी आयोगासमोर मान्य केले. ही सदनिका चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या मालकीची असून ती त्यांनी आपल्याला भाड्याने दिल्याचे अर्जात नमूद केले आहे. मात्र हे चुकीचे आहे; असे शर्मा यांनी स्पष्ट केले. आपण अर्जावर केवळ सही केली. तो लिहिला कोणी हे आपल्याला माहित नाही; असेही त्यांनी सांगितले.

सोसायटीच्या नियमाप्रमाणे सदस्यत्वाची मागणी करणारया अर्जदाराची मुंबईत स्वत:ची जागा असता कामा नये. शर्मा यांचा अर्ज सोसायटीला १३ ओगस्ट २००९ रोजी दाखल करण्यात आला आणि तो ३० ओगस्टला मंजूर करण्यात आला. या काळात चव्हाण हेच राज्याचे मुख्यमंत्री होते.

आदर्श प्रकरणात अनियमितता असल्याचे वर्तमानपत्रात वाचल्यावर आपण स्वत: सोसायटीला आपले सदस्यत्व रद्द करण्याची विनंती केल्याचेही शर्मा यांनी आयोगासमोर नमूद केले.

चव्हाण यांनी जवान आणि शहिदांच्या कुटुंबासाठी असलेल्या आदर्श सोसायटीमधील ४० टक्के जागा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या केल्या आणि त्या जागा आपल्या नातेवाईक मंडळींना वितरीत केल्या असा आरोप आहे.

Leave a Comment