मुंबई दि.२५- चित्रपट शूटिंगच्या दरम्यान नट अथवा नट्यांसोबत येणारा त्यांचा पर्सनल स्टाफ हा चित्रपट निर्मात्यांच्या डोके दुखीचा तसेच मोठ्या खर्चाचाही विषय बनला होता. मात्र आता या स्टाफचा खर्च अॅक्टर स्वतःच्या खिशातून भरणार आहेत व त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला असून अॅक्टरनी तो मान्य केला आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी अॅक्टर अथवा नट्यांबरोबर त्यांचा जो पर्सनल स्टाफ येत असे त्याचाही खर्च निर्मात्यालाच करावा लागत होता. मेकअप स्टाफ, कलाकाराच्या गाडीचा चालक, हेअर स्टायलिस्ट, पर्सनल ट्रेनर वगैरे लोक त्यांचा दररोजचा खर्च निर्मात्याकडूनच वसुल करत असत. हा खर्च १५ हजार रूपयांपासून ५० हजार रूपयांपर्यंत कितीही असे. नट किवा नटी जितकी लोकप्रिय असेल त्यानुसार हा खर्च वाढत असे. गिल्डचे सदस्य निर्माते रतन जैन म्हणाले की वास्तविक नियमाप्रमाणे हा खर्च नट किवा नटीने करायला हवा. मात्र नियम कोणीच पाळत नव्हते. त्यामुळे हा स्टाफ मनाला येईल ती रक्कम चार्ज करत असे.
नियमाप्रमाणे हा खर्च दिवसाला १ हजार ते १५०० रूपयांपर्यंत अपेक्षित असताना प्रत्यक्षात तो दहा ते शंभर पट अधिक वसूल केला जात होता. मात्र या विषयी संस्थेने कलाकारांशी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न आता सुटला आहे. ए ग्रेडमध्ये येणारे सलमान, शाहरूख, अजय देवगण, अक्षयकुमार या नटांनी गिल्डचा निर्णय मान्य केला असून तो आजपासूनच अमलात आणला जाणार आहे. परिणामी कलाकार आणि निर्माते यांच्यातील संबंध अधिक सशक्त होण्यासही मदत होणार आहे असे जैन यांचे म्हणणे आहे.