मुंबई, दि.२६ – टॅबलेट व्यवसायातील विकासाच्या संधी आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपनीने परवडण्याजोग्या टॅबलेटची निर्मिती केली. दूरसंपर्क क्षेत्रातील अमेरिकन कंपनी `स्वाइप टेलिकॉम’ने देशातील पहिला थ्रीडी टॅबलेट पीसी बाजारात दाखल केला आहे. सात इंचांचा स्क्रीन, थ्रीजी, थ्रीडी आणि अँड्रॉइडमधील ‘आयस्कीम सँडविच’ या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्या ‘थ्रीडी लाइफ’ या टॅबलेटची किंमत केवळ ५,९९९ रुपये आहे.
याचबरोबर आणखी दोन टॅबलेट पीसी कंपनीने बाजारात दाखल केले. थ्रीडी तंत्रज्ञानाचा समावेश असलेला टॅबलेट केवळ ५,९९९ रुपयांमध्ये आणून कंपनीने टॅबलेटच्या बाजारपेठेत स्पर्धा निर्माण केली आहे.
कंपनीने थ्रीडी लाइफ, हॅलो टॅब (एक्स ७४ एस) आणि स्वाइप फ्लोट टॅब (एक्स ७८) या तीन टॅबलेट पीसींचे अभिनेत्री मलायका अरोरा खान हिच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यामध्ये थ्रीडी लाइफची किंमत ५,९९९ रुपये, हॅलो टॅब (एक्स ७४ एस)ची किंमत ८,९९९ रुपये आहे. तसेच स्वाइप फ्लोट टॅब (एक्स ७८) ची किंमत ६,९९९ रुपये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
देशात टॅबलेट पीसींची मागणी झपाट्याने वाढत असून येत्या काळात वर्षाला १० लाख टॅबलेटची विक्री होईल, असे स्वाइप टेलिकॉमचे अध्यक्ष श्रीपाल गांधी यांनी सांगितले. यामध्येही परवडण्याजोग्या टॅबलेटकडे ग्राहकांचा अधिक ओढा असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.