प्रवाशांनो; टोल भरू नका: राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: राज्यातील महामार्गांवर टोल वसुलीमध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नाही. टोलच्या माध्यमातून जनतेला निव्वळ लुबाडण्याचे काम चालते. त्यामुळे नागरिकांनी आजपासून टोल भरू नये; असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेले काही दिवस राज्यातील टोल नाक्यांवर येणारे वाहने आणि त्यांच्याकडून घेतला जाणारा टोल याबाबत नोंदी घेतल्या. या माहितीच्या विश्लेषणातून टोल वसुलीत मोठे गैरप्रकार सुरू असल्याचे आढळून आले; असे सांगून ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की; टोल वसुलीबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांना धाब्यावर बसविले जात आहे. दोन टोल नाक्यांमध्ये ३५ किलोमीटर अंतर असणे आवश्यक आहे असा नियम आहे. मात्र हा मियाम पाळला जात नाही. टोलद्वारे वसूल केलेला पैसा कुठे आणि कसा खर्च होतो; याची माहितीही राज्य शासनाने न दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

जनतेची ही लूट थांबविण्यासाठी नागरिकांनी टोल देणे बंद करावे. जबरदस्तीने टोल वसूल करण्याचे प्रयत्न झाल्यास मनसेचे कार्यकर्ते टोल नाक्यावर उभे राहून त्याला विरोध करतील; असा इशाराही त्यांनी दिला. आम्हाला राज्य शासनाशी संघर्ष नको आहे. मात्र सरकारने बळजबरी केली तर मनसे त्याविरोधात उग्र आंदोलन छेडेल; असेही ते म्हणाले.

Leave a Comment