कॅननचा कॉम्पॅक्ट एसएलआर कॅमेरा लवकरच बाजारात

टोकियो, दि. २४ – जपानच्या जगप्रसिद्ध कॅनन कंपनीने `व्ह्यू फाईंडर’रहित नव्या `सिंगल लेन्स रिफ्लेक्शन’ (एसएलआर) छोट्या कॅमेर्‍यांची मालिका बाजारात आणण्याची तयारी चालविली. कॉम्पॅक्ट एसएलआर कॅमेर्‍यांच्या वाढत्या बाजारपेठेत आपला हिस्सा वाढविण्याचा कंपनीचा हा प्रयत्न आहे. छोट्या परंतु लेन्स बदलत्या येणार्‍या कॅमेर्‍यांची मागणी वाढत असून, निकॉन कॉर्पोरेशनने गेल्याच वर्षी या प्रकारच्या कॅमेर्‍यांची मालिका बाजारपेठेत आणली आहे.

कॅनन इन्कॉर्पोरेशनने दरमहा एक लाख कॅमेर्‍यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आरसा नसलेल्या `व्ह्यू फाईंडर’रहित कॅमेर्‍यांचे सेन्सर आकाराने मोठे असल्यामुळे चित्राचा दर्जा अधिक चांगला वाटतो. शिवाय कॅमेर्‍याचा आकारही कमी राखता येत त्यामुळे तो वजनालाही हलका आहे, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जपानमध्ये सहज वागविता येणार्‍या वस्तूंना अधिक मागणी असते. `व्ह्यू फाईंडर’ एकूण कॅमेर्‍याचा एक तृतियांश आकार व्यापतो. त्यामुळे तो काढून टाकल्यास कॅमेर्‍याचा आकार अधिक लहान आणि हाताळण्यास सोपा होतो, असा कंपनीचा म्हटले आहे.

टोकियोच्या शेअर बाजारात सोमवारी दुपारी कॅननचे शेअर ३ टक्क्यांनी आणि निकॉनचे २.६ टक्क्यांनी घटले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एसएलआर कॅमेर्‍यांमध्ये निकॉनला सर्वाधिक मागणी आहे. व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांचाही हेच कॅमेरे खरेदी करण्याकडे कल असतो. निकॉनशी सशक्त स्पर्धा करण्यासाठी कॅनननेही आता कंबर कसली आहे.