सर्वाधिक भाषा बोलणार्‍या राज्यात महाराष्ट्र पहिला

गुजराथच्या तेजगड येथील  भाषा संशोधन संस्था या खासगी संस्थेने देशभरातील २१ राज्यात बोलल्या जाणार्‍या भाषांसंबंधात केलेल्या संशोधनात देशात सर्वाधिक भाषा बोलले जाणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. महाराष्ट्रात तब्बल ५२ भाषा बोलल्या जातात असे आढळले आहे.

भाषा हे संवादाचे मुख्य साधन आहे. अर्थात ती बोली भाषा असू शकते, लिपी असू शकते, चित्रलिपीही असू शकते. सध्या भारतात १०८ भाषा बोलल्या जातात. या उपक्रमाविषयी माहिती देताना भाषा संशोधन संस्थेचे संचालक गणेश देवी म्हणाले की देशात किती प्रकारच्या भाषा बोलल्या जातात यावर संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारचा स्वतंत्र सेटअप आहे. आम्ही केलेल्या देशभरातील २१ राज्यांच्या संशोधनात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ५२ भाषा बोलल्या जात असल्याचे दिसून आले असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राने या भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या संशोधनात ८० स्वयंसेवी संस्था आणि ३५०० स्वयंसेवकांनी सहभाग दिला असून गेली तीन वर्षे हे काम सुरू होते. यात माजी कुलगुरूंपासून ते अगदी बसचालकांपर्यंत असे विविध थरातील समुदायांची माहिती घेण्यात आली. या उपक्रमासाठी ५६० लाख रूपये खर्च आला.

गणेश देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने ११ व्या पंचवार्षिक योजनेत याच कार्यक्रमासाठी ६०० कोटी रूपयांची तरतूद केली असून ५५ संस्था अणि दोन हजार कर्मचार्‍यांना हे काम देण्यात आले आहे. आमचा अहवाल देशभर स्वीकारावा यासाठी केंद्रीय मानवसंसाधन मंत्री कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. आम्हाला केंद्राकडून आर्थिक सहाय्याची अपेक्षा नाही. या संशोधनाचे २१ व्हॉल्यूम्स तयार झाले असून ते ३० जानेवारी २०१३ ला म.गांधी मेमोरियल नवी दिल्ली येथे सूपूर्द केले जाणार आहेत.

भाषा आणि लिपी यांचा तसा अर्थाअर्थी कांही संबंध नाही असे सांगून देवी म्हणाले की रोमन लिपी असूनही आपण इंग्लीश भाषा म्हणून स्वीकारतो. तसेच अनेक भाषांची लिपी एक असू शकते किवा एकाच भाषेत अनेक लिप्याही असू शकतात.

Leave a Comment