अफझल गुरूचा माफी अर्ज फेटाळा- बाळासाहेब ठाकरे

मुंबई दि.२३- संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरूचा फाशीच्या शिक्षेविरूद्ध करण्यात आलेला दयेचा अर्ज फेटाळून नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीचा प्रारंभ करावा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे आहे. आपल्या मुखपत्र सामनामधून त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

राष्ट्रपतीपदावर निवड होऊन चोवीस तासांचा अवधी होत नाही तोपर्यंतच प्रणव मुखर्जी यांच्याकडे विविध अपेक्षा व्यक्त केल्या जाऊ लागल्या असून त्यांना मतदान केलेले सर्वच पक्ष आता आपल्या मतांचा परतावाच जणू मागू लागले आहेत. शिवसेनेने तर त्यांच्या आघाडीविरूद्ध जाऊन प्रणवदांना मतदान केले आहे. १३ वे राष्ट्रपती म्हणून प्रणवदांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रणवदांचे अभिनंदन करतानाच शिवसेनेलाही धन्यवाद दिले आहेत.

राष्ट्रपतींकडे सध्या २७ दयचे अर्ज दाखल असून त्यात राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी फाशी झालेल्या तीन जणांच्या अर्जांचाही समावेश आहे. २००८ ते २०११ या काळात दाखल झालेल्या या अर्जांपैकी तीन अर्ज फेटाळले गेले आहेत, १० जणांची फाशी जन्मठेपेत बदलण्यात आली आहे तर १४ अर्जांवर अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. अफजल गुरूच्या अर्जावर निर्णय घेताना प्रणवदांवर चांगलेच दडपण असेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

Leave a Comment