मर्चंट नेव्हीत छान संधी

navy

ज्याला युद्धाचा अनुभव नको आहे पण नाविक दलाशी संबंधित नोकरी करायची असेल अशा धाडशी तरुणांसाठी मर्चंट नेव्ही हे एक चांगले क्षेत्र आहे. या नोकरीत जग पाहता येते आणि अनेक धाडसी मोहिमा आखता येतात. या नोकरीत प्रामुख्याने मालवाहू बोटीचा संबंध येतो. काही वेळा प्रवाशांना घेऊन जाणार्‍या बोटींचेही व्यवस्थापन करता येते. या क्षेत्रात पदवीधरांना नेव्हिगेशन ऑफिसर, रेडिओ ऑफिसर्स आणि मरीन इंजिनिअर्स अशा नोकर्‍या मिळू शकतात. पण शिपिंग कंपन्या त्यांना कराराने नोकर्‍या देत असतात. हा करार सहा ते नऊ महिन्यांचा असतो. पूर्वी ही नोकरी म्हणजे पुरुषांची मक्तेदारी समजली जात होती. पण आता महिलाही या क्षेत्रात उतरल्या आहेत. महिला साधारणत: शिप डॉक्टर्स आणि रेडिओ ऑफिसर्स म्हणून काम पाहतात. या कामांसाठीचे अभ्यासक्रम  मुंबईच्या टी. एस. चाणक्यमध्ये आणि कोलकत्त्याच्या  `मरीन इंजिनयरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेत दिले जातात. इ.मेल ऍड्रेस  www.merical.ac.in असा आहे. मर्चंट नेव्हीत मुख्य कामे तीन विभागात केली जातात. डेक, इंजिन आणि सर्व्हिस डिपार्टमेंट. डेकवर कॅप्टन, चीफ ऑफिसर अशा श्रेणीने  कामे केली जातात. शेवटी ज्युनियर ऑफिसर असतो. इंजिन विभागात अशीच अभियंत्यांची रचना असते. सर्व्हिस भागात लॉंड्री, किचन, वैद्यकीय सेवा आणि अशाच तत्सम सेवांचा समावेश असतो.

अर्थातच यातल्या तांत्रिक भागांसाठी नोकरी हवी असणारांना प्रशिक्षणासाठी प्रवेश घेताना १०+२ ही पात्रता आवश्यक आहे. या वर्गात त्यांनी विज्ञानाशी संबंधित विषय घेतलेले असले पाहिजेत. उमेदवारांना प्रवेश परीक्षा दिल्यानंतरच प्रवेश दिला जातो पण त्याला वैद्यकीय चाचणीतही उत्तीर्ण व्हावे लागते. त्याला रंगांधळेपणा असून चालत नाही. या विद्यार्थ्यांना  मरीन इंजिनियरिंग किंवा नॉटिकल सायन्स या दोन्ही पैकी एक पदवी दिली जाते. ती प्राप्त केल्यानंतरच त्यांना कंपन्यांत नोकरी मिळते. यातली मरीन इंजिनियरिंग ही पदवी कोलकत्याच्या संस्थेत तर नॉटिकल सायन्सची पदवी मुंबईतल्या टी.एस. चाणक्य वर करता येते. या अभ्यासक्रमांना प्रवेश देतानाची प्रवेश परीक्षा फार कडक असते. आय. आय. टी. सारख्या संस्था या परीक्षा घेतात. नंतर वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. फिजिक्स, गणित यांचे ज्ञान पारखून घेतले जाते. यात उमेदवारांत बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता किती आहे याचीही चाचपणी केली जाते. उमेदवार फार चाणाक्ष आणि सावध असला पाहिजे. काही उमेदवारांनी अभियांत्रिकीतली पदवी घेतलेली असेल, तर त्यांना थेट नोकरीवर घेतले जाते पण त्याआधी अनेक परीक्षांतून जावे लागते. या नोकर्‍यांत मिळणारे वेतन कंपनी आणि शहरांनुसार बदलत असते, पण ते तुलनेने चांगले असते. भत्तेही अनेक मिळत असतात.

Leave a Comment