टायटन इंडस्ट्रीची मंदीला झुगारून घोडदौड

मुंबई दि.२३- टाटा ग्रुपच्या टायटन या ज्युवेलरी पासून आयवेअर (चष्मे) रिटेलर विभागाने देशातील मंदीला झुगारून देऊन दोन ते अडीच लाख स्क्वेअर फूटाने आपली रिटेल स्पेस वाढविण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे सोनेदर वाढीने देशभरात सोन्याची मागणी कमी होत असतानाही टाटाने त्यांच्या तनिश्क ज्युवेलरी उद्योगाचा दुप्पट विस्तार केला आहे. या आर्थिक वर्षात टायटन देशभरात २२५ घड्याळे व अक्सेसरीजची, ५५ ज्युवेलरीची तर ४५ आयवेअरची दुकाने सुरू करत आहे असे त्यांच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीच त्यांची देशातील १५७ शहरात ८२७ दुकाने आहेतच.

घड्याळ्याच्या बाजारपेठेवरील टायटनचे वर्चस्व आजही कायम आहे. त्यामागे सतत केला जात असलेला विस्तार, भक्कम नेटवर्क आणि सातत्याने बाजारात आणली जात असलेली नवीन उत्पादने कारणीभूत आहेत. शिवाय टायटन आणि फास्टट्रेक चे जाळे सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, द.आफ्रिका, सौदी अरेबिया या देशातही विस्तारले गेले आहे. यंदाच्या वर्षात टायटन आणि फास्ट ट्रेकचा मार्केट शेअर वाढेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे .तर ज्युवेलरी विभागात नवीन डिझाइन्स बाजारात आणण्याबरोबरच नेटवर्क अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. आयवेअर विभागातही नवीन मॉडेल्स आणली जात असून पुरवठा चेन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

टायटन कॅपेक्स कडून असेही सांगण्यात आले की गेल्या वर्षीच त्यांचा नवीन प्लॅन्ट सुरू करण्यात आला असून व्यवसायात ६ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. ही वाढ एक आकडी दिसत असली तरी बाजाराच्या तुलनेत ती चांगलीच आहे. संघटीत घड्याळ उद्योगात टायटनचा वाटा ६५ टक्के असून देशभरात त्यांची उत्पादने ९००० वितरकांच्या सहाय्याने विकली जात आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड ऑफ टायटनची ३३४ स्टोअर्स असून फास्ट ट्रेकची १०६ स्टोअर्स कार्यरत आहेत.

Leave a Comment