जीओ इन्फर्मेटिक्स्

geoi

बायो टेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन तंत्रज्ञानाचा मिलाप होऊन बायो इन्फर्मेटिक्स् हे शास्त्र विकसित झाले आहे. त्याच धर्तीवर भूगोलाच्या क्षेत्रात जीओ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे शास्त्र तयार झालेले आहे. हे अगदीच नवे करिअरचे क्षेत्र असल्याने त्याची फारशी माहिती लोकांपर्यंत पोचलेली नाही. आपल्या सामान्य आणि दैनंदिन भाषेत बोलायचे झाले तर हे शास्त्र गुगलवरील गावागावांचे नकाशे तयार करण्यास उपयुक्त ठरत असते असे म्हणता येईल. इन्फर्मेशन देण्याची टेक्नॉलॉजी कोणत्याही क्षेत्रामध्ये कळीची ठरायला लागली आहे.

त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधी अफाट आहेत. या क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना जमिनीवरची सगळी माहिती गोळा करणे, जंगलांची माहिती गोळा करणे, समुद्राच्या पाण्याची माहिती गोळा करणे अशी कामे करावी लागतात. भारताच्या अंतराळ संशोधकांनी पृथ्वीवरची सारी माहिती गोळा करणारे अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. हे उपग्रह त्यांच्यावर बसवण्यात आलेल्या कॅमेर्‍यांच्या साह्याने पृथ्वीचे हजारो फोटो घेत असतात आणि ते पृथ्वीवर दर तासाला पाठवत असतात. या फोटोतून मिळालेल्या प्रतिमांचे विश्‍लेषण करून त्यातली भौगोलिक माहिती शोधून काढण्याचे काम जीओ इन्फर्मेटिक्स् शास्त्राचा तज्ज्ञ करत असतो.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवार विज्ञान शाखेचा पदवीधर असावा लागतो. त्याशिवाय जिओग्राफी, जिओलॉजी, शेती, अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या शास्त्रांच्या अभ्यासाठी पार्श्‍वभूमी त्याला असावी लागते. विविध संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या या शास्त्राच्या पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या पदव्या मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, हवमान खाते आणि अशा अशा शेकडो संशोधन संस्थांमध्ये उत्तम नोकर्‍या मिळत असतात. या विषयातील अभ्यासक्रम पुरविणार्‍या संस्था फार मोजक्याच आहेत. त्यातील एक संस्था पुण्यातले आहे. त्या संस्थेचे नाव सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जीओ इन्फर्मेटिक्स्  असे असून तिचा पत्ता  http://sigpune.com/index.html असा आहे. त्याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग ऍन्ड सेन्सिंग (आयआयआरएस) डेहराडून या संस्थेमध्येही या विशिष्ट विषयाच्या अभ्यासाची सोय आहे. तिचा इमेल ऍड्रेस http://www.iirs.gov.in असा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ खरगपूर, रुरकी आणि कानपूर या तीन संस्थांमध्ये सुद्धा हा विषय शिकवला जातो आणि जीओ इन्फर्मेटिक्स मध्येही पदव्युत्तर पदवी दिली जाते. ज्या तरुणांना नव्या युगात निर्माण होणार्‍या करिअर संधींची आव्हाने पेलायची असतील, त्यांनी या शास्त्राच्या अभ्यासाकडे जरूर वळावे.

Leave a Comment