जादुई प्लॅस्टीक कोटींग

इंडोव्हेन टेक्नीकल विद्यापीठातील डच संशोधकांनी स्क्रॅच आले तरी पुन्हा पूर्वीप्रमाणेच होणारे नॉनस्टीक संरक्षक प्लॅस्टीक कोटिंग तयार करण्यात यश मिळविले आहे. जो पर्यंत या कोटींगची पूर्ण मोडतोड होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कितीही स्क्रॅच आले तरी ते पुन्हा पूर्वीप्रमाणेच होऊ शकणार आहे असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत फ्राईंग पॅन्सपासून ते कपड्यांवर केल्या जाणार्‍या अॅटी बॅक्टेरियल कोटींग पर्यंत तसेच अँटी कोरोसन कोटींगपासून ते आयफोन चार वरील ओलिओफोबिग कोटींगपर्यंत सर्वत्र प्लॅस्टीक हा महत्वाचा भाग आहे. हे कोटींग अतिशय महागडे असते व त्यामुळे ते अगदी पातळ थरांतच वापरले जाते. परिणामी अशा कोटींगवर एक जरी स्क्रॅच आला तरी पूर्ण वस्तूची शोभा जाते.

डच संशोधकांनी तयार केलेले हे सेल्फ हिलिंग कोटींग तांत्रिक दृष्ट्या थोडे ट्रिकी आहे. पण ते रोजच्या वापरातील वस्तूंसाठी वापरणे शक्य होऊ शकते. यात वापरण्यात आलेला कोटींग फॉर्म्युला वेगळा असून हे तीन लेअरमध्ये तयार करण्यात आले आहे. पहिल्या लेअरमध्ये पाण्याचा वापर असून मधला लेअर पॉलिमर स्टॉकचा आहे तर तिसर्‍या लेअरमध्ये कोटींगमधील घटकांची साठवण करण्यात येते. वरच्या लेअरला स्क्रॅच गेला की खालच्या लेअरमधील घटक आपोआप वर येतात आणि हे कोटींग पूर्ववत होते. ही प्रक्रिया कितीही वेळा होऊ शकते. अन्य कोटींगबाबत हेच तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र आजकाल वापरात असलेली बहुसंख्य कोटींग पॉलिमर बेस्ट असल्याने ते शक्य होईल असा संशोधकांना विश्वास वाटतो आहे. त्यामुळे स्मार्टफोनचे स्क्रीन प्रोटेक्टर, टॅब्लेटचे धूळ व बोटांच्या ठशांपासून संरक्षण होऊ शकणार आहेच पण कार, विमान, जहाजे यांच्यापासून ते घरगुती वापराचे फ्राईंग पॅन्सही आहे त्याच स्वरूपात कायम राहू शकणार आहेत. डोळ्यातील कॉन्टॅक्ट लेन्सेससाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकेल असाही विश्वास संशोधकांना वाटत आहे.

Leave a Comment