पुणे, दि.२२ – शिवाजी महाराजांचे चरित्र जसे शतकानुशतकांना प्रेरणा देणारे आहे त्याच प्रमाणे तानाजी मालुसरे, कान्होजी आंग्रे, जेधे, मुरार बाजी देशपांडे, अशी अनेक पात्रे आहेत त्यांचे चरित्रही तेवढेच प्रेरणादायक होऊ शकते, त्यांचे उल्लेख ग्रंथातून आहे. पण सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या माहितीच्या प्रवाहात त्यांचेही स्वतंत्र स्थान असणे आवश्यक आहे, यासाठी शिवचरित्रातील अशा बारा पात्रांवर तीस ते पस्तीस मिनिटांच्या सिडी काढण्याचा संकल्प सोडला आहे, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नव्वदाव्या वर्षात पदार्पण
‘राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या आठशे पानी शिवचरित्राची अजून मोठी डिलक्स आवृत्ती काढण्याचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. ती आवृत्ती कदाचित पन्नास हजार प्रतींची असेल. ही आवृत्ती एक मोठा ग्रंथही असेल आणि ते छोटे छोटे अनेक ग्रंथही असतील. त्या ग्रंथात तानाजी मालुसरे, मुरारबाजी, कान्होजी, बाजी प्रभू, हे जसे स्वतंत्र ग्रंथही असतील, त्याचप्रमाणे त्यांच्यावरील सीडीजही तयार होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजून बरेच राहिले अजून मला परमेश्वराने पाच वषें द्यावी, असेही त्यांनी बोलून दाखविले.
`शिवाजी महाराज हाच श्वास आणि शिवाजी महाराज हाच उच्छश्वास’ या पद्धतीने वयाची नव्वदी पार करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज म्हणजे नागपंचमीला एक्याण्णव्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेली कांही वर्षे वय बाबासाहेबांसाठी जणू थांबलेलेच आहे. कारण आजही तोच जोम, तोच उत्साह, तोच उल्हास आणि नवी स्वप्ने पाहण्याची ऐपत ते बाळगून आहेत. नवी स्वप्ने, नव्या कल्पना, नव्या आशा, नव्या आकांक्षा याविषयी बाबासाहेब ज्या उत्साहाने बोलतात, तो तरूणांनाही लाजविणारा असतो.
वाढदिवसानिमित्ताने नवीन काय, असे विचारताच बाबासाहेबांच्या बोलण्याला एकदमच गती येते. नुकताच त्यांनी विठाभाऊ नारायणगांवकर यांच्यावर सादर झालेला एक कार्यक्रम पाहिला. कथनाच्या पद्धतीने केलेल्या या कार्यक्रमातून बाबासाहेबांना नवी प्रेरणा मिळाली आणि शिवचरित्रातील किमान १२ पराक्रमी वीरांच्या नुसत्या पराक्रमाच्या नव्हे तर त्यांच्या जीवनकार्याच्या कथा अशा ३०-३५ मिनिटांच्या कार्यक्रमातून सीडी रूपाने प्रसिद्ध कराव्यात अशी मनीषा जागी झाली. पुरंदरावर दिलेरखानाविरूद्ध लढून वीरमरण पत्करलेल्या मुरार बाजी देशपांडे, जंजिर्याच्या किल्ल्याला शिड्या लावूनही अखेर मोहिमेत अपयश आलेला लायजी पाटील, अवघ्या ७०० मावळ्यांनिशी ३ हजार पठाणांशी कण्हेरगडाजवळ दिलेरखानाविरूद्ध लढलेला आणि विजयश्री मिळविलेला रामाजी पांगेरा. किती वीर सांगायचे? या वैभवशाली आणि पराक्रमाचा वारसा पुढच्या पिढीला कळायला हवा आणि त्यांचीही आयुष्ये त्यातून समृद्ध व्हायला हवीत यासाठी हे काम करायलाच हवे असे सांगून बाबासाहेबांनी कामाची यादीच वाचली.
आयुष्यात पाहिलेले शिवसृष्टी उभारण्याचे स्वप्न अजून थोडे शिल्लक राहिले आहे. बांधकाम झाले आहे; पण ऐतिहासिक वस्तू जागच्या जागी ठेवून ते सजवायचे काम राहिले आहे. ते पुढील तीन महिन्यात होईल. ऐतिहासिक पद्धतीचा हा वाडा त्या काळात युवा पिढीला घेऊन जाईल अशा पद्धतीने हे बांधकाम करण्यात आले असून, आता तेथे संग्रहालय उभारणीचे काम सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा पिढी आज गड कोट, किल्ल्यांवर जाते आहे पण ते आपल्या या वैभवशाली परंपरेकडे कसे पाहतात हे पाहायला हवे असे सांगताना बाबासाहेब म्हणाले की, युवा पिढीला आपला इतिहास कळायला हवा. त्या काळच्या लोकांचे जीवनमान, त्यांच्या कल्पना, त्यांची हौस आणि त्यांची चैन कळायला हवी. त्यामुळे गडकोट, किल्यांचे रिस्टोरेशन करताना शास्त्रशुद्ध पद्धतीने, अभ्यास करून पूर्ण व्हायला हवे अशीही त्यांची अपेक्षा आहे.
आजपर्यंत हजारो व्याख्याने दिलेल्या बाबासाहेबांची व्याख्यानांची सुरुवात कधी झाली. याविषयी बोलताना ते म्हणाले की, शिवाजी महाराजांवरील व्याख्याने तरूण वयात सुरू झाली असली, तरी पहिला परफॉर्मन्स त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी कोणतीही तयारी न करता दिला होता. त्यांचे मामा चिंचवडला राहात होते पण मूळ गांव ताथवडे. बाबासाहेब मामाकडे गेले असताना नृसिंह जयंती आली. ताथवड्याला नृसिंह मंदिरात उत्सव होता आणि जबाबदारी मामांकडे होती. सायंकाळी कीर्तन असायचे. बाबासाहेब मामांबरोबर या उत्सवासाठी चिंचवडहून ताथवड्याला गेले. मात्र, कीर्तनकार आलेच नाहीत. मग मामानी बाबासाहेबांनाच नृसिंहाची गोष्ट सांग असा आग्रह केला आणि बाबासाहेबांनीही साभिनय गोष्ट सांगितली आणि ती लोकांना भयंकर आवडली. कदाचित तेव्हाच आपल्या अंगातील या कलेची ओळख त्यांना झाली असावी.
इतिहास हा अभ्यासाचा विषय नसता तर अन्य काय करायला आवडले असते, असे विचारले असता बाबासाहेबांनी गाण्यात, चित्रकलेत, अभिनयात आयुष्य वेचायला आवडले असते असे सांगितले.
या वयातील या उत्साहामागचे रहस्य काय, असे विचारले असता मात्र बाबासाहेबांच्या मिश्कील स्वभावाची प्रचीती यावी असेच उत्तर मिळाले. बाबासाहेब म्हणाले, ‘ याला उत्साह वगैरे कांही नाही तर स्वच्छ शब्दात म्हातारचळ म्हणतात. तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचे झाले तर हे सारे व्यसनी माणसासारखे आहे. महर्षी वाल्मिकीपासून तुळशीदासापर्यंत आणि एकनाथांच्या पासून गदिमापर्यंत सर्वांनी रामकथा ब्रह्माण्डापल्याड नेली, तर आपणही ते काम शिवाजीमहाराजांबाबत नको का करायला, असे सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला.
