
भारतामध्ये मोटारकारच्या उत्पादनामध्ये क्रमांक एकवर असलेल्या मारुती सुझुकी या कारखान्यामध्ये गेल्या आठवड्यात काही हिंसक घटना घडल्या. त्यामुळे या कारखान्यातले उत्पादन ठप्प झाले आणि कारखान्याला प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. हरियाणाच्या मानेसर या शहरानजिक असलेल्या औद्योगिक विभागात हा कारखाना आहे. तिथे गेल्या तीन वर्षांपासून अधूनमधून संप व्हायला लागले आहेत. या संपांमुळे गतवर्षी या कारखान्याचे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. या कारखान्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची स्विप्ट ही डिझेल कार तयार केली जात असते. ती डिझेलवर चालत असल्यामुळे तिला प्रचंड मागणी आहे. मात्र कारखान्यात सातत्याने संप होत असल्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम झालेला आहे. मानेसरच्या या औद्योगिक अशांततेचे नेमके कारण काय, यावर बराच खल जारी आहे. कंपनीचे व्यवस्थापन यावर आपले मत व्यक्त करताना एक गोष्ट आवर्जून सांगत आहे ती म्हणजे हा संप पगारवाढीसाठी नाही आणि ही गोष्ट खरीही आहे.
एखाद्या कारखान्यामध्ये संप व्हायचा म्हटला, की तो पगारवाढीसाठीच असणार असे आपण गृहित धरत असतो आणि ही वस्तुस्थिती सुद्धा आहे. कारण तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी साधारणत: पगारासाठीच काम करत असतात आणि त्यामुळे पगार हेच त्यांचे उद्दिष्ट असते. पगारात होणारी वाढ, मिळणारे भत्ते, जादा कामाचा पगार हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात आणि त्यात काही कमी-जास्त झाले की कामगार संपाला उद्युक्त होतात. मात्र मानेसर येथील मारुती सुझुकी कंपनीचा संप तसा नाही. मग तो नेमका काय आहे, यावर बरीच चर्चा चाललेली आहे. सध्या आपल्या देशामध्ये संपांचे प्रमाण फार कमी झालेले आहे. कारण देशाचे औद्योगीकरण वेगाने होत आहे आणि त्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ म्हणावे तेवढे निर्माण होत नाही. त्यामुळे नोकरी करणे ही कामगारांची गरज आहेच पण कामगार मिळणे ही कारखानदारांची अधिक गरज झालेली आहे. म्हणावे तसे आणि म्हणावे तेवढे कामगार मिळतच नाहीत, अशी कारखानदारांची तक्रार आहे. परिणामी १९७० आणि ८० च्या दशकामध्ये देशात जशी बेकारी जाणवत होती तशी आता राहिलेली नाही. कामगार तेवढा लाचार राहिलेला नाही. म्हणून कारखानदारांना कामगारांची पिळवणूक करण्याची संधी नाही. निदान वेतनात तर नाही.
