मुंबई, दि. २३ – बुद्धिबळासारख्या खेळाचा उपयोग अभ्यासासाठीही होऊ शकतो, असे बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदने शनिवारी म्हटले. एनआयआयटी आयोजित ’माइंड चॅँपियन्स ऍकॅडमी’च्या कार्यक्रमादरम्यान कांदिवलीच्या धनमाल हायस्कूलमध्ये आनंदने हे विचार मांडले. त्यावेळी त्याने शालेय विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळण्याचा आनंदही लुटला.
बुद्धिबळासारखा डोक्याला चालना देणार्या खेळाचा शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोग होऊ शकतो का, याबाबत विचारले असता, ’’बुद्धिबळ या खेळामुळे तुमची एकाग्रता वाढते. गणित, विज्ञानसारख्या कठीण विषयांचा अभ्यास करताना या खेळाचा जास्त उपयोग होतो. बुद्धिबळ हे तर्क लढवून खेळले जाते. त्यामुळे तर्कावर आधारित गणिते सोडवण्यास त्याचा उपयोग होतो. याशिवाय नेहमी सर्व कामे तुम्ही आत्मविश्वासाने करू शकता. हादेखील बुद्धिबळाचा एक फायदा आहे. बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढते. फक्त बुद्धिबळच नाही तर कोणत्याही स्पर्धेला तुम्ही धैर्याने तयार राहता,’’ असे आनंदने सांगितले.
बुद्धिबळ हा हुशार लोकांचाच खेळ आहे, या समजाविषयी आनंद म्हणतो, ’’हे कदाचित बरोबर असावे. कारण हा खेळ वैयक्तिक पातळीवर खेळला जातो. त्यामध्ये तुमच्या क्षमतेवर तुम्हाला चाल खेळायची असते. यशापयश दोन्ही तुमचेच असते. त्यातच या खेळात कोणीही आपला ’बॉस’ नसतो. गुणवत्तेवर आधारित असणारा असा हा खेळ आहे.’’
बुद्धिबळ साधारणपणे कोणत्या वयात खेळायला सुरुवात करणे योग्य आहे, यावर, ’’ बुद्धिबळ ही एक भाषा आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. एखाद्या भाषेचे ज्ञान आपण ज्याप्रकारे आत्मसात करू तसेच बुद्धिबळ खेळाचे ज्ञानही कोवळ्या वयात अवगत करून घेणे चांगले ठरेल. माझ्या बाबतीत सांगायचे तर वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. माझ्या आईने मला बुद्धिबळ शिकवले. मात्र चौथ्या ते पाचव्या वर्षापासून मुले बुद्धिबळ खेळू शकतात. कारण त्या वयात त्यांची आकलनशक्ती चांगली असते. ’एनआयआयटी माइंड चॅँपियन्स ऍकॅडमी’ या कार्यक्रमाअंतर्गत गेली नऊ वर्षे आम्ही अनेक शाळांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बुद्धिबळ खेळणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, हाच त्यामागे उद्देश आहे. आमचा उद्देश मोठ्या प्रमाणात सफल झाला असून, मुलांनाही त्याचा अभ्यासात उपयोग होत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत आम्ही १५ लाख मुलांपर्यंत पोहोचलो आहोत,’’ असे पाचवेळा जगज्जेता ठरलेल्या आनंदने म्हटले.
मे महिन्यात जगज्जेतेपद राखल्यानंतर दरम्यानच्या कालावधीत आनंद एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेला नाही. आता सप्टेंबरमध्ये बिल्बाओ ग्रॅँडस्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत आनंद सहभागी होणार आहे.