उद्धव ठाकरे यांच्यावरील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई: शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृदयावर लीलावती रुग्णालयात करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रविवारी घरी सोडण्यात येईल असे शस्त्रक्रिया करणारे  डॉक्टर म्हणाले. शस्त्रक्रियेच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बाधू राज ठाकरे हे देखील रुग्णालयात उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना आपल्या प्रकृतीची खुशाली कळविली.
 
शुक्रवारी सकाळी १० वाजता उद्धव रुग्णालयात दाखल झाले. डॉ. सेम्युअल मेथ्यू यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाने आवश्य तपासण्यांनंतर उद्धव यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली. यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ऑपरेशन थिएटरमध्ये तर राज, त्यांच्या पत्नी शर्मिला आणि आई कुंदाताई रुग्णालयात उपस्थित होत्या. शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच उद्धव शुद्धीवर आले आणि त्यांनी बाळासाहेबांशी संपर्क साधला. याच वेळी राज आणि कुटुंबियांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.  

Leave a Comment