पिक्चर ’बकवास’ है मेरे दोस्त !

महाभारतात ज्याप्रमाणे ’मैं समय हूं’ अशी भविष्यवाणी होते, अगदी त्याचप्रमाणे ’मैं सिनेमा हूं’ म्हणत चित्रपटाची सुरुवात होते. हा चित्रपट बॉलिवूडवर आधारीत आहे. एक तरुण दिग्दर्शक (सुनील शेट्टी) लंडनमधून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेऊन मुंबईत चित्रपट तयार करण्याच्या उद्देशाने दाखल होतो. एक पत्रकार तरुणी कशाप्रकारे औषधांचा काळाबाजार उघडकीस आणते, अशी या दिग्दर्शकाच्या चित्रपटाची कथा असते. या तरुण दिग्दर्शकाचा मित्र (राजपाल यादव) बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोटी मोठी भूमिका करत असतो. चित्रपटांमध्ये एक्स्ट्रा म्हणून काम करणार्‍या कलाकारांच्या घरातील भिंतींवर गोविंदा आणि बॉबी देओलचे पोस्टर लावलेले दिसायचे.
हा तरुण दिग्दर्शक आपल्या चित्रपटासाठी निर्माता मिळावा म्हणून मोठमोठ्या कलाकारांचे सेक्रेटरी, निर्माता, पब्लिसिटी एजंटच्या ऑफीसला फेर्‍या मारत असतो. या निर्मात्यांचा भर एकतर ईल चित्रपट बनवण्यावर असतो किंवा एखादा धार्मिक चित्रपट. या नवोदित दिग्दर्शकाला कुणीच उभे करत नाही. मात्र शेवटी एक निर्माता या नवोदित दिग्दर्शकाचे कौशल्य ओळखतो आणि चित्रपटात पैसा लावायला तयार होतो. या दिग्दर्शकाला त्याच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी अभिनेत्रीही भेटते.

सुनील शेट्टी या सेकंड रेट मुव्हीचा दिग्दर्शक असतो. खरे तर सुनील शेट्टीच्या बरोबर असलेले आमिर, शाहरुख, सलमान आणि सैफपुढे सुनीलचा ठावठिकाणा लागला नाही, ही खरचं दु:खद गोष्ट म्हणावी लागेल. हे सगळे कलाकार सुनीलच्या किती तरी पुढे निघून गेले. असो या तरुण दिग्दर्शकाला त्याचा चित्रपट तयार करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इतकचं नाही तर त्याला हवा तसा चित्रपट तो तयार करु शकत नाही, कारण आता त्याच्या चित्रपटात अंडरवर्ल्डचाही समावेश झालेला असतो. डॉनच्या प्रेयसीचा आयटम नंबरही चित्रपटात घेण्याची त्याच्यावर वेळ येते. अँक्शन हिरोला रोमॅण्टिक सीन हवा असतो, तर रोमॅण्टिक हिरो अँक्शन सीनची मागणी या दिग्दर्शकाकडे करतो. या सगळ्या गोंधळात बिचार्‍या या नवोदित दिग्दर्शकाला डोक्यावर हात ठेऊ बसावे लागते.

एखादा वाईट सिनेमा तयार करण्यासाठी काय काय करावे लागते हे या दिग्दर्शकाला कळून चुकले असते. बी ग्रेड चित्रपट तयार करता करता हा चित्रपटच बी ग्रेडपेक्षाही खालच्या दर्जाचा बनतो. प्रेक्षकांना चित्रपटात शेवटपर्यंत काय सुरु आहे हे कळतच नाही. म्हणूनच प्रेक्षक `पिक्चर अब भी बाकी’च्या ऐवजी `पिक्चर बकवास है’ म्हणतच थिएटरबाहेर पडतात.

चित्रपट : मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है
स्टारकास्ट : सुनील शेट्टी, उदिता गोस्वामी, ओम पुरी, राजपाल यादव
दिग्दर्शक : रजनीश राज ठाकुर
निर्माता : नरेंद्र सिंग
संगीत : अमजद नदीम, देवी श्री प्रसाद

Leave a Comment