जमिनीवर पडणारे तारे

महाराष्ट्र शासन, त्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. मान्सूनचा सामना करण्यासाठी तयारी सुद्धा अपूर्ण आहे. मात्र, बॉलिवूडमधील दिग्गजांच्या आहारी गेलेली व्यवस्था माधुरी दीक्षितच्या प्रस्तावित नृत्य अकादमीसाठी प्लॉट दाखवण्याच्या कामाला महत्त्व देत आहे. ज्या शहरात जवळपास ३० लाख लोक झोपडपट्टीत राहतात आणि बहुतांश लोकांचे संपूर्ण आयुष्यच फुटपाथवर जाते त्या महानगराचे अधिकारी एका अभिनेत्रीला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी व्याकूळ झालेले आहेत. त्यांना सामान्य माणसांच्या वेदना दिसत नाहीत, परंतु त्यांच्या डोळ्यांत करिअरच्या उतरत्या काळातील एका धक-धक नायिकेचे सौंदर्य साठलेले आहे. त्यांना भुकेने व्याकूळ झालेल्या लोकांचा सुस्कारा ऐकू येत नाही, परंतु त्यांच्या कानामध्ये पैंजणांची छम-छम गुंजत आहे. आपल्या व्यवस्थेत साधनहीन लोकांसाठी उदासीनता पसरलेली आहे. व्यवस्थेतील लोक चित्रपट कलाकारांसाठी पापण्यांच्या पायघड्या अंथरण्यातच स्वत:ला धन्य मानतात.

शासकीय कार्यालयांमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत फायली धूळ खात पडून आहेत, पण एका अभिनेत्रीच्या मदतीसाठी अधिकारी तत्पर आहेत. ’क्या जमाना है, क्या नजारा है, और क्या सितारा है’. प्रसिद्ध कलाकार व्यवस्थेकडून सवलती मागण्याच्या कोणत्याच संधी सोडत नाहीत. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने भेट स्वरूपात मिळालेल्या फेरारी कारसाठी कस्टम विभागाकडे कर सवलत देण्याची विनंती केली होती. कर सवलत मिळाली की नाही, हा मुद्दा नाही. पण सवलती मागण्याची मानसिकता आणि स्टार योग्यतेच्या उसापासून रसाचा अखेरचा थेंबही काढण्याचा हा मुद्दा आहे. रस काढल्यानंतर उसाच्या चोथ्याकडे जनावरे पाहात सुद्धा नाहीत, ही परिस्थिती रस काढणार्‍या या कलाकारांची आहे.

’रसिया ने सब रस ले लिया रे पिंजरे वाली मुनिया, चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजरे वाली मुनिया’, हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. बॉलिवूड कलाकारांपुढे व्यवस्थेचे झुकणे आणि संपन्न व्यक्तीकडून स्वत:साठी सवलती मागणे हे एकाच स्वार्थी मानसिकतेचे दोन पैलू आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षितची ’ज्ञानदान’ करण्याची इच्छा असणे, ही आनंदाची बाब आहे. परंतु त्यासाठी स्वत: संपन्न असतानाही तिला जमीन खरेदी करावी वाटत नाही. माधुरी सुंदर आणि प्रतिभावान आहे, परंतु तिने प्रकाश झा यांचा ’मृत्युदंड’ वगळता कोणत्याही महान चित्रपटात काम केलेले नाही. तिच्याकडे यशस्वी चित्रपटांची मोठी संख्या आहे, पण ’बंदिनी’, ’मदर इंडिया’ किंवा ’पाकिजा’ यांसारखा एकही चित्रपट तिच्या नावावर नाही. त्यामुळे काही वर्षांनंतर तिची आठवण कशी राहील? विनंती करूनही तिने आपल्या मातृभाषेत एकही चित्रपट केलेला नाही. तिने महाराष्ट्रासाठी काय केले? केवळ काही वर्षे अमेरिकेत घालवल्यानंतर आता ती हिंदी आणि मराठी भाषासुद्धा अमेरिकन शैलीत बोलते. किशोरावस्थेत माधुरीने भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते, हे खरे आहे.

मात्र, महाराष्ट्रातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील किशोरवयीन मुली गायन, नृत्य, रंगभूमी इत्यादीचे प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. खरेच एवढ्या मर्यादित अनुभवातून तुम्हाला शिक्षण देण्याचा अधिकार मिळतो काय? चित्रपटांसाठी माधुरीने अनेक लोकप्रिय नृत्य केले आहे आणि ’चोली के पीछे क्या है’ सारख्या गाण्याद्वारे सुद्धा सुंदर नृत्याविष्कार केला आहे, हे मात्र खरे आहे. खरेच तिच्या प्रस्तावित नाट्यशाळेत तरुण मुली ’चोली’ आणि ’धक-धक’ साठी येतील, हा अंदाज लावणे चुकीचे ठरेल काय? विद्यार्थ्यांना खरेच तिच्याकडून नि:शुल्क ’ज्ञान’ मिळणे शक्य आहे काय? ही ’नाट्यशाळा’ समाजसेवेसाठी उभारली जात आहे काय? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.

माधुरी आणि सचिनची उदाहरणे प्रातिनिधीक. आजार मात्र सर्वव्यापी आहे. हा मुद्दा महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून अनेक प्रांतात तेथे जन्मलेल्या प्रसिद्ध लोकांनी आपल्या वशिल्याचा फायदा घेत जमिनी हडपल्या आहेत आणि अनेक ठिकाणी तथाकथितरीत्या जन्मलेल्या ’लोकल’ नायकांनाही जमिनीचे वाटप केले आहे. हे सर्व जमिनीचे वाटप कोणत्या ना कोणत्या शाळेच्या किंवा केंद्राच्या नावावर झाले आहे आणि तेथे कोणतीही संस्था उघडण्यात आली नाही. राजकीय पक्षांनीसुद्धा आपल्या वशिल्याचा वापर करत संस्कृतीच्या विकासाच्या नावावर जमिनी हडपल्या आहेत. संपूर्ण जगाचे पोलिस आणि गुप्तहेर संस्थासुद्धा दिवस-रात्र काम करून ’भारत महान’ मध्ये जमीन आणि संपत्ती हडपण्याचे सर्व गुन्हे उजेडात आणू शकत नाहीत. तुम्ही डोळे बंद करून दगड मारल्यास तो कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यावरच जाऊन पडेल. यासाठी सर्व राजकीय पक्षच जबाबदार आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी शेतकरी असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून जमिनी हडपल्या आहेत. त्यापैकी एकानेही चित्रपटात शेतकर्‍याची साधी भूमिकाही साकारलेली नाही. त्यांना डॉन बनण्यापासून सवडच मिळाली नाही.