अबू जिंदाल ३१ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत

मुंबई: मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील प्रमुख संशयित अबू जिंदाल याला मुंबईच्या न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) त्याची चौकशी करणार असून त्याच्याकडून दहशतवादी संघटन आणि कारवाया याबाबत महत्वाची मिळण्याची शक्यता आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी सकाळी अबूला दिल्लीहून मुंबई येथे आणण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात विमानतळावरून त्याची अज्ञात स्थळी रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबई महानगर न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. मुंबीवरील हल्ल्यासह पुण्याचा जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, औरंगाबाद येथील बेकायदेशीर शस्त्रसाठा आणि नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावरील हल्ल्याचा कट या प्रकरणात चौकशी करण्यासाठी न्यायालयाने जिंदाल याला मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या हवाली केले.

मुंबई पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अबूला पुन्हा दिल्ली येथे नेण्यात येणार असून दिल्ली न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा अथवा इतर कोणत्या तपास यंत्रणेला त्याची चौकशी करावयाची असल्यास त्यासाठी परवानगी देण्यात येईल.