स्पर्धा परिक्षा इच्छुकांसाठी स्टडीबडी अप्लिकेशन

पुणे दि.१९- देशात स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून २०२० सालापर्यंत स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या पाच कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांना घरबसल्याही करता यावा आणि या परिक्षांसाठीच्या सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना असलेल्या वेळेनुसार सोडविता याव्यात यासाठी स्टडीबडी अॅप्लीकेशन आता मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोट्यावधी विद्यार्थ्यांना हे अॅप्लिकेशन अतिशय उपयुक्त ठरणार असून व्होडाफोन, आयएमएस व ब्लॅकबेरी अशा तीन नामवंत कंपन्यांनी एकत्र येऊन हे अॅप्लिकेशन सादर केले आहे. पुण्यात हे अॅप्लीकेशन नुकतेच सादर करण्यात आले त्यावेळी माजी कुलगुरू अरूण निगवेकर हेही उपस्थित होते.

व्होडाफोनचे इस्मित सिंघ, आयएमएसचे कमलेश संजानी व ब्लॅकबेरीचे सुनील दत्ता या अॅप्लिकेशनविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले की पुण्यात हे अॅप्लिकेशन सर्वप्रथम सादर करण्यामागे पुण्यात प्रचंड प्रमाणात असलेली विद्यार्थी संख्या हे मुख्य कारण आहे. पुणे विद्येचे माहेरघर आहे तसेच पूर्वेचे ऑक्सफर्ड अशीही त्याची ओळख आहे. पुण्यात शैक्षणिक संस्थांची संख्या ही मोठी आहे. हे अॅप्लिकेशन विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरणार असून यावर आय आय टी, आय आय एम, अभियांत्रिकी, बँक अशा विविध स्पर्धा परिक्षांसाठी देण्यात येणारे सराव प्रश्नसंच उपलब्ध होऊ शकणार आहेत.

Leave a Comment