‘जीना और मरना किसी की हाथ में नहीं होता. ओ तो उपरवाले के हाथ में होता है. कौन किस समय चल बसेगा यह कोई भी नहीं बता सकता. हम सब कठपुतलीयॉँ है और हमारी दोरिया उपरवाले के हाथ में है.’ राजेश खन्ना यांचा `आनंद’ या चित्रपटातल्या हा संवाद कोण विसरेल ? जन्म आणि मृत्यू ही तर दोन अंतिम सत्ये आहेत. त्यांची तीव्र जाणीव करून देणारा पण स्वत: मात्र अमर झालेला हा चित्रपट राजेश खन्ना यांचा पहिला गाजलेला चित्रपट. त्यात त्यांना कर्करोग झालेला असतो. मृत्यू समोर दिसत असतो. तरीही आनंदी जीवन जगणारा हा आनंद सर्वांना चटका लावून मरतो आणि जाता जाता जीवन क्षणभंगूर आहे तरीही ते आनंदाने जगले पाहिजे असे सांगून जातो. सत्यातल्या आणि पडद्याबाहेरच्या खर्या राजेश खन्नालाही कर्करोगानेच मृत्यू आला आहे. एखादा कसलेला पटकथा लेखकही इतक्या करुण योगायोगाची कल्पना करू शकणार नाही. राजेश खन्नाची चित्रपटातली एन्ट्रीही नाट्यमय तशीच जीवनाच्या रंगमंचावरून झालेली एक्झिटही नाट्यमय ठरली आहे.
`आनंद’ चित्रपटात हा आनंद आपल्या अल्पायुष्यावर टिप्पणी करताना म्हणतो, `जिंदगी लंबी नही होनी चाहिए, सुंदर होनी चाहिए. आयुष्य लहान असले तरी चालेल पण ते सुंदर आणि संपन्न असले पाहिजे.’ राजेश खन्ना यांची चित्रपट कारकीर्द हीही तशी फार लांबलचक नाही. ती जेमतेम २० वर्षांची आहे. तिच्यात चित्रपटही जेमतेम १२५ असतील. या वीस वर्षातली पहिली पाच वर्षे धडपडीची आणि सुरूवातीचे चित्रपट फ्लॉप होण्याची, तर शेवटची पाच वर्षे मावळतीची. एकुण झळाळती कारकीर्द मोजली तर ती होते १० वर्षे. पण `आनंद’ मधील संवादाप्रमाणे ही कारकीर्द लंबी नाही पण सुंदर आहे. चित्रपटाच्या इतिहासाच्या भाषेत बोलायचे तर राजेश खन्ना हा जेमतेम १९७० च्या दशकातला कलाकार होता. पण त्याची ही छोटी कारकीर्द जेवढी छोटी तेवढीच त्याला कीर्तीच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी आणि चित्रपट सृष्टीला अनेक नवे प्रघात प्रदान करणारी ठरली आहे.
नायिकेवर प्रेम करणारा आणि त्या साठी खलनायकाशी मरेमरेतो मारामारी करणारा हीरो होण्याचा म्हणजेच ‘त्या काळात चित्रपट अभिनेत्याला लोकप्रियता मिळवून देणार्या फॉर्म्युल्यातला’ हिरो होण्याचा हव्यास राजेश खन्नाला नव्हता. त्याने केलेल्या भूमिकांवर नजर टाकली तर असे लक्षात येते की त्याने `आनंद’ , `बावर्ची’, `आराधना’ मधल्या भूमिकांच्या धर्तीवरची कामेच अधिक पसंत केली होती. १९८० च्या दशकात तो या पठडीतल्या बाहेरची देमार कामे नाकारायला लागला म्हणून चित्रपट सृष्टीत मागे पडला; पण असे झाले तरीही त्याने आपल्या अल्पशा कारकीर्दीत आपल्या खास भूमिका अजरामर करून टाकल्या होत्या. तेवढ्यानेच त्याला इतके लोकप्रिय केले होते की, त्याला आपोआपच सुपरस्टार हे अभिधान प्राप्त झाले. चित्रपट सृष्टीत एकुलता एक नायक सुपरस्टार असण्याची त्या काळात प्रथा नव्हती. पण, राजेश खन्ना याने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हा मान पहिल्यांदा मिळवला. सुपर स्टार ही पदवी त्याआधी चित्रपट रसिकांनी अन्य कोणालाच दिली नव्हती.
१९६६-६७ च्या काळात हा पंचविशीही न गाठलेला पंजाबी तरुण नशीब काढण्यासाठी मुंबईत आला. पण अन्य कोणत्याही यशस्वी नटाप्रमाणे त्यालाही सुरूवातीला या सृष्टीचे बंद दरवाजे पाहून निराश व्हावे लागत होते. कारण तो काळ देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार अशा दिग्गज नटांनी व्यापलेला होता. त्यांची नक्कल करीत मोठा स्टार होण्याची स्वप्ने पाहणारे अनेक तरुण या सिनेसृष्टीच्या दरवाज्यांवर दस्तक देत होते. राजेश खन्नानेही दस्तक दिली पण ती देताना कोणाची नक्कल केली नाही. त्याचा ‘आराधना’तला हीरो पाहून सर्वांना हे काही तरी वेगळे प्रकरण आहे याचा साक्षात्कार झाला आणि राजेश खन्नाची एक वेगळी ढब निर्माण झाली. त्याने कोणाची नक्कल केली नाही पण सर्वांकडून चांगले तेवढे आत्मसात केले.
देव आनंदची स्टाईल, दिलीप कुमारची एकाग्रता आणि राज कपूरचा चार्म यांचा त्याने आपल्या अभियनात स्वीकार केला. हा नवा हीरो बघता बघता अनेक तरुणींच्या स्वप्नातला प्रियकर होऊन बसला. हजारो युवती त्याच्यासाठी आपल्या पापण्यांच्या पायघड्या अंथरायला तयार होऊ लागल्या. १९७० च्या दशकाचा तो एक आगळा वेगळा अभिनेता ठरला. त्याच्या अभिनयात रोमान्स होता. हलकेफुलकेपणा होता पण त्याच्या बहुतेक भूमिकांना आपल्या जीवनाशी संबंधित अशा साध्याच पण तत्त्वज्ञानाची डूब होती. ही त्याची खासीयत होती.
राजेश खन्नाने आपला असा एक नवा ड्रेसही लोकप्रिय केला. तो ड्रेस गुरूशर्ट म्हणून प्रसिद्धी पावला. नेहरू शर्ट आणि बुशशर्ट यांचा मिलाप असलेला हा नवा शर्ट वापरणे हे त्या काळातल्या विशी तिशीतल्या तरुणांचे वेडच झाले होते. राजेश खन्नाच्या आधीचे नायक मुक्तपणे नाचत नसत. राजेश खन्नाने ते नाचणे सुरू केले. ते अमिताभ बच्चनने वाढवले आणि आता त्यामुळेच लग्नाच्या वरातीमध्ये सारी तरुणाई (आणि वृद्धही ) नाचताना दिसत आहे. शास्त्रीय नृत्य आणि भांगडा यांच्या मधला हा नाच ही राजेश खन्नाची या चित्रपट सृष्टीला मिळालेली खास भेट. रुपेरी विश्वातली ही लोकप्रियता राजकारणात एन्कॅश करण्याचा मोह राजेश खन्नालाही आवरता आला नाही. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, धर्मेन्द्र, विनोद खन्ना, वैजयंती माला, हेमामालिनी, देव आनंद यांच्याप्रमाणे राजेश खन्ना यांनीही राजकारणाच्या सागरात दोन हात मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची इतरां प्रमाणेच दमछाक झाली. वय वाढल्यानंतर त्यांच्या चित्रपटांना गळती लागली. लोकांना अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन आवडायला लागला. त्यामुळे राजेश खन्ना यांचा सूर्य मावळतीला गेला. मावळताना त्याने या दुनियेवर आपला असा एक ठसा उमटवला तो कायम स्मरणात राहील.