
केंद्र सरकारने नुकतीच देशातल्या स्वयंसेवी संघटनांची यादी आणि त्यांना परदेशातून मिळणारी मदत जाहीर केली आहे. भारतामध्ये जवळपास १४ लाख स्वयंसेवी संघटना (एन.जी.ओ.) आहेत आणि त्या समाजाच्या भल्यासाठी अनेक प्रकारची कामे करीत असतात. सरकारनेही अलीकडच्या काळात अशा संघटनांना सोबत घेऊन सरकारचे काही प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनजीओंच्या कार्याची व्याप्ती प्रचंड वाढत चालली आहे. सरकारच्या योजनांशिवाय इतरही अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थांकडून राबवले जातात आणि त्यातल्या अनेक उपक्रमांना शासनाकडून अनुदानही दिले जाते. अशा प्रकारचे अनुदान अब्जावधी रुपयांमध्ये आहे. परंतु ही अनुदाने घेणार्या संस्था योग्य प्रकारे काम करतात का, आणि त्यांना मिळणार्या अनुदानाचा योग्य तो उपयोग होतो का? याची चाचपणी कोणीही करत नाही. सरकारच्या पातळीवर या संस्था, त्यांचे उपक्रम आणि त्यांना दिला जाणारा निधी याबाबतीत ‘आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं’ अशी झालेली आहे. या स्वयंसेवी संघटनांचे व्यवस्थापन नीट केले गेले तर या अनुदानाला आणि पैशाला न्याय मिळणार आहे. पण या स्वयंसेवी संघटनांनासुद्धा आपले काम समाधानकारकरित्या करता येणार आहे. म्हणूनच एनजीओ मॅनेजमेंट अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम करिअरच्या क्षेत्रामध्ये निर्माण झाला आहे.
