अनेक राजकारणी नेते विविध आजारांचे शिकार

मुंबई दि.१९ – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अचानक उद्भवलेल्या आजारामुळे राज्यात कांही काळ खळबळ उडाली असली तरी त्यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकारणांची तब्येत हा विषय चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे देशात व त्यातही महाराष्टातील अनेक नेते कांही ना कांही व्याधींनी त्रस्त असून त्याचा परिणाम त्यांच्या सार्वजनिक जीवनावरही होताना दिसत आहे. कार्यकर्ते आणि आपले समर्थक यांच्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून बहुसंख्य नेते आपल्या आजारपणाची खबर लपवितच असतात मात्र प्रसारमाध्यमांना मिळत असलेल्या माहितीनुसार आज अनेक नेत्यांना आपल्या आयुष्यातला बराचसा काळ औषधोपचार आणि विविध तपासण्या यांत घालवावा लागत आहे.

उद्धव ठाकरे यांचे आजारपण म्हणजे प्रकृती अस्वास्थ्य असलेल्या नेत्यांच्या भल्या मोठ्या यादीतील अॅडीशन असेच म्हणावे लागेल. केंद्रीय कृ षी मंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार गेली अनेक वर्षे तोंडाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. राजकीय आणि प्रशासकीय कामात ते अजून कार्यरत असले तरी त्यांना दररोज उपचार घ्यावे लागतात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही गंभीर आजार झाला असल्याचे वृत्त असून तेही विविध चाचण्या करून उपचार घेत आहेत.

भाजपचे नितीन गडकरी यांनाही जबरदस्त मधुमेह असून त्यांनी वजन कमी करण्यासाठी नुकतीच सर्जरी केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनाही रक्तशर्करेचा विकार आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना हाय ब्लड प्रेशर आणि स्पाँडिलायटीसचा त्रास आहे. माजी मंत्री भाजपचे राम नाईक कर्करोगातून नुकतेच बरे झाले आहेत. महाराष्ट्राच्या माजी मंत्री विमल मुंदडा यांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे तर मनसचे आमदार रमेश वांजळे हे ४५ व्या वर्षीच हार्ट अॅटकने गेले आहेत.

केंद्रातही हे व्याधींचे लोण पसरले असून भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरूण जेटली यांना हृदयाचा विकार आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांची दोन वर्षांपूर्व बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. आणि ते कडक डायटवर आहेत. संरक्षणमंत्री अॅटनी हेही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कार्यक्रमात बेशुद्ध पडल्यापासून त्यांनाही डॉक्टरांनी सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे. माजी मंत्री मुरली देवरा  यांनाही प्रकृती अस्वास्थामुळे मंत्रीपद सोडावे लागले आहे.

मुंबईतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. प्रफुल्ल केरकर याविषयी बोलताना म्हणाले की राजकारणी लोकांची एकूण जीवनशैली, कामाचे जादा तास, प्रवास, व्यायामाचा अभाव, जेवण्याच्या वेळा अनिश्चित असणे आणि ताणतणाव यामुळे दुखण्यांचे प्रमाण वाढतेच असून तरूण पिढी व्यवसाधीन असल्यामुळे त्यांच्यातही आजारांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील अनेक तरूण नेत्यांनी मात्र वेळीच सावध होण्याचा शहाणपणा दाखविला असून भाजपचे विनोद तावडे,  देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रवक्ते संजय दत्त यांनी व्यायाम आणि वजन उतरविण्याची कामगिरी यशस्वी पणे पार पाडली आहे. कांही जणांनी शाकाहाराचा पुरस्कार करून मद्य, तंबाखू यांना कायमचा रामराम केला आहे असेही समजते.

Leave a Comment