विश्रामबाग वाड्यासमोर दोन पथारी व्यावसायिकांचा खून

पुणे, दि. १९ – पथारी लावण्यावरून झालेल्या वादात पितापुत्रांनी तिघांवर सपासप वार करत दोघांचा खून केला, तर अन्य एकाला जखमी केले. जखमीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या एकाला जखमीवर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) मकरंद रानडे यांनी सांगितले. बाजीराव रस्त्यावर विश्रामबाग वाड्याच्या पोस्ट कार्यालय असलेल्या कोपर्‍यावर आज भरदुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती.

सचिन मारुती कुडले (वय ३५, रा. गुरुवार पेठ) आणि सागर संभाजी लहरे (वय २७,  रा. तळजाई वसाहत) असे या घटनेत खून झालेल्या दोघांची नावे आहेत. कुडले याचा नातेवाईक कैलास सुनील चव्हाण (वय ३०, रा. गंजपेठ) हा किरकोळ जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांवर हल्ला केल्याप्रकरणी दत्तात्रय रामचंद्र तांबडे (वय ५५) आणि त्याचा मुलगा सागर (वय २५, रा. १३२२ सदाशिव पेठ) या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी जागेवरच अटक केली आहे.

तांबडे पिता-पुत्र आणि इतर तिघे हे सर्वजण पथारी व्यावसायिक असून विश्रामबाग वाड्यासमोर नेहमी पथारी मांडून बसतात. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पादचार्‍यांसाठी बॅरीकेड्स लावण्यात आले असून, तेथे कोणत्याही प्रकारच्या वस्तू विक्री करण्यास बंदी आहे, त्याच ठिकाणी हे सर्वजण व्यवसाय करतात. दत्तात्रय तांबडे हा गेल्या महिन्यात पालखी सोहळ्याबरोबर वारीला गेला होता. त्यामुळे तो बसत असलेली जागा रिकामी होती. त्या जागेवर सचिन कुडले याने आपल्याकडील विक्रीच्या वस्तू मांडून व्यवसाय सुरू केला. आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेल्या तांबडे याने काही दिवसांपूर्वी परत आल्यानंतर आपली जागा रिकामी कर, असे कुडले याला सांगितले. त्यावेळी दोघांत बाचाबाची झाली. तो वाद वाढत जाऊन रोज त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा याच कारणावरून सचिन कुडले आणि तांबडे यांच्यात भांडणे झाली होती. दुपारी तांबडे आणि त्याच्या मुलाने थेट कुडले याच्यावर चाकूनेच हल्ला चढविला. मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या कुडले याचा नातेवाईक चव्हाण यालाही या दोघांनी भोसकले. जवळच असलेला सागर लहरे हा पथारी व्यावसायिक त्यांना समजविण्याचा प्रयत्न करू लागताच त्यांनी त्याच्यावरही हल्ला केला; त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला, असे विश्रामाबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जून सकुंडे यांनी सांगितले.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणे
पथारी लावण्यावरून झालेली ही घटना अत्यंत गंभीर असून अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई केली पाहिजे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच ही अतिक्रमणे होतात, असा आरोप मकरंद रानडे यांनी केला. ते वारंवार कारवाया करतात; मात्र पुन्हा अतिक्रमणे होत राहतात, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पोलीसही त्यांच्यावर कारवाई करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. तांबडे पिता-पुत्रांकडे चाकू कोठून आला याबाबत माहिती घेण्यात येत असून, तो चाकू जप्त करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.